Maharashtra Prerna Geet Puraskar: छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून दिला जाणारा पहिला 'महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कारा'ची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला’ या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
ज्या पध्दतीने महाराष्ट्रभूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात. त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 2 लाख रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेत 'बुधभुषण' हा ग्रंथ लिहिला होता. तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले होते. त्यामुळेच त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र शासन यावर्षी पासून एका प्रेरणा गीताचा सन्मान करणार आहे.
'माणसाचा जन्मापासून मृत्यू पर्यंतचा प्रवास हा एक मोठा संघर्ष असतो. या संघर्षात संकटसमयी मनाला उभारणी देण्याचे काम काव्य पंक्ती करतात, जगण्याला प्रेरणा देतात. म्हणून अशा प्रेरणा गीतांचा सन्मान व्हावा तोही आपल्या स्वराज्यासाठी अफाट संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे व्हावा अशी या मागची कल्पना असल्याचे,' आशिष शेलार यांनी सांगितले.
सावरकर पॅरिसहून लंडनला रेल्वेने आल्यावर ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून खटला भरला. त्यांच्यावरचा खटला इंग्लंडमध्ये न चालवता भारतात चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सावरकरांना लंडनहून मोरिया बोटीने हिंदुस्थानात नेण्यात आले. ती बोट मार्सेलिसच्या बंदरात आल्यावर सावरकरांनी ८ जुलै १९१० या दिवशी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी मारली. सावरकर ६० यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या म्हणजे "अनादी मी ... अनंत मी.. हे गीत आहे.
या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह सांस्कृतिक संचनालयाचे संचालक, गोरेगाव चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालक, उपसचिव सांस्कृतिक कार्य, पु. ल देशपांडे कला अकादमी संचालक, दर्शनिका विभाग संपादक या समितीचे सदस्य आहेत. मंत्री आशिष शेलार हे फ्रान्स दौऱ्यावर असून, याबाबतची आज ऑनलाईन बैठक घेऊन यावर्षीचे प्रेरणा गीत म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गीताची निवड एकमताने करण्यात आली असल्याचे सांगितले. या बैठकीला अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक संचालक विभिषण चवरे, चित्रनगरीच्या संचालक स्वाती म्हसे पाटील, पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालक मिनल जोगळेकर आणि डॉ. बलसेकर आदी सदस्य उपस्थित होते. हा पुरस्कार कवींना देण्यात येणार असून कवी जर हयात नसतील तर त्यांच्या नातेवाईक अथवा त्यांचा वारसा सांगणाऱ्या संस्थांना प्रदान करण्यात येणार आहे.