Video Sonali Bendre : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या मुंबईतील दादरमधील असणाऱ्या शिवाजी पार्क इथं एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला विशेष उपस्थितीसह मान्यवरांनी मराठीतील काही दर्जेदार कवितांचं वाचनही केलं.
महाराष्ट्राच्या या भूमींमध्ये मोठ्या झालेल्या या कलाकार मंडळींनी केलेल्या काव्यवाचनानं कार्यक्रमासाठी आलेल्या रसिकांनीसुद्धा भारावल्याची प्रतिक्रिया दिली. या कार्यक्रमात विशेष लक्ष वेधून गेली ती म्हणजे अभिनेत्री सोनाली बेंद्रे.
हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मोठं करणारी आणि एक काळ गाजवत आपल्या सौंदर्यानं अनेकांनाच घायाळ करणारी सोनाली या कार्यक्रमासाठी आली आणि तिथं असणारा प्रत्येकजण तिच्या स्मितहास्यानं घायाळ झाला. सोनाली एक अभिनेत्री म्हणून इथं हजर राहिली असली तरीही तिच्या काव्यवाचनानंही साऱ्यांच्याच मनाचा ठाव घेतला.
कविवर्य विंदा करंदीकर यांच्या 'घेता' या कवितेला सादर करत असताना आवाजातील चढ- उतार, शब्दांची लकब अतिशय सुरेखरित्या हाताळत कविचा प्रत्येक शब्द अतिशय प्रत्ययकारीरित्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सोनालीनं केला.
"देणार्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे."
अशी ही कविता वाचत असताना प्रत्येत शब्द फक्त सोनालीच नव्हे, तर व्यासपीठावरील मान्यवरांसह प्रेक्षकांमधील प्रत्येकजण लक्षपूर्वक ऐकत होता आणि सोनालीच्या या काव्यवाचनाला दाद देत होता.