Swargate Rape Case UBT Slams Pune People: "स्वारगेट बलात्कार प्रकरणात ‘पुणे हादरले’ असे म्हणतात, पण पुणेकर हादरले असे काही दिसले नाही. त्यांचे जीवन आरामात चालले आहे. पुण्याची संवेदना, मानवता व लढाऊ बाणा संपला आहे. पुण्यावर गेल्या काळात जे बाह्य लोकसंख्येचे सांस्कृतिक आक्रमण झाले, त्यामुळे पुण्याचा सामाजिक लढवय्या आत्मा जवळ जवळ मृत झाला. स्वारगेट कांडातील आरोपी दत्ता गाडे याचे कोणत्या पक्षाशी लागेबांधे आहेत हे शोधून आता त्यावर चिखलफेक सुरू झाली असा आरोपी कोणत्याही पक्षाचा, पंथाचा आणि धर्माचा असेल, तो काय कुणाची परवानगी घेऊन असे विकृत कृत्य करतो? त्यास बेड्या ठोकणे व कठोर शिक्षा ठोठावणे हेच कायद्याचे काम आहे, पण या अशा प्रकरणातही राजकीय पक्षांना बदनाम करण्यातच धन्यता मानली जात असेल तर महाराष्ट्रात प्रत्यक्ष देव उतरले तरी महिलांवरील अत्याचार थांबणार नाहीत," असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
"बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे व आता स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेसुद्धा पळून गेला. पक्षांतर केलेले आमदार पोलीस बंदोबस्तात सुरतला पोहोचवले तसे कडेकोट संरक्षण या गुन्हेगारांनाही लाभले आहे काय? असा प्रश्न पडतो. सरकारची संवेदना मेली आहे आणि पुणेकर आपला बाणेदार पूर्वेतिहास विसरून खून, बलात्कार पचवून अजगरासारखे निपचित पडले आहेत," असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
"आज महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत, पण लाडक्या बहिणींना संरक्षण नाही. कारण राज्यात गुंडांना राजकीय संरक्षण लाभले आहे. पुण्यात खून, अपहरण, खंडणी, महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत. भररस्त्यात हाती कोयते व तलवारी नाचवत गुंड टोळ्या थैमान घालतात, हे कसले चित्र आहे?" असा सवालही ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.
नक्की वाचा >> 'स्वारगेट'चा नेमका अर्थ काय? हे नाव आलं तरी कुठून? 10 पैकी 9 जणांना याची कल्पनाच नाही
"खून, बलात्कार, कोयता गँग हीच आता पुण्याची संस्कृती झाली. विद्येचे माहेरघर व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही ओळख त्यामुळे पुसली गेली याचे दुःख कोणालाच नाही. स्वारगेटच्या निर्भया कांडाने पुणे हादरले, तरी पुणेकर थंड पडले ते त्यामुळेच. पुणेकर थंड आणि ‘लाडक्या बहिणीं’ना 1500 रुपये देऊन त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणारे सध्याचे राज्यकर्ते त्यापेक्षा जास्त थंड. मग राज्यात खून, गुन्हेगारी आणि स्त्री अत्याचारांची ‘बेबंदशाही’ माजणार नाही तर काय होणार?" असा सवाल लेखाच्या शेवटी विचारला आहे.