Vasai Crime News: वसईमध्ये प्रेमप्रकरणामधून दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. एका घटनेमध्ये उत्तर प्रदेशमधील आरोपीने आपल्याच प्रेयसीची हत्या करुन पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘दृश्यम’ स्टाइल नाटक केल्याचं उघड झालं आहे. अन्य एका घटनेमध्ये प्रियकराने प्रेयसीवर कैचीने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही गोष्टींनी वसईमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशात राहणार्या 25 वर्षीय तरुणीची दृश्यम स्टाईल हत्या केल्याचे प्रकरण वसईत उघडकीस आले आहे. प्रिया सिंग असं या मयत तरुणीचे नाव असून ती मूळ उत्तर प्रदेश येथील गोरखपुर येथे राहणारी आहे. वसईच्या गिरीज येथे राहणार्या अमित सिंग (28) या तरुणाचे प्रिया सिंगबरोबर प्रेमसंबंध होते. प्रिया ही अमितकडे लग्नाचा तगादा लावत होती, मात्र त्यालाही लग्न करायचे नव्हते. प्रियाकडून सतत लग्नाची मागणी होत असल्याने अमितने तिचा काटा काढायचं ठरवलं. अमितने प्रियाला वसईत बोलवून तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर प्रियाचा मृतदेह वसईच्या पोमन गावात फेकून दिला.
ही हत्या उघडकीस येऊ नये यासाठी अमितने पुरावा नष्ट करण्यासाठी ‘दृश्यम’ सिनेमातील कथानकाप्रमाणे पोलिसांची दिशाभूल केली. प्रियाची गळा दाबून हत्या केल्यानंतर त्याने प्रियाचा मोबाईल दिल्लीत जाणार्या ट्रेनमध्ये टाकला. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल झाली आणि पोलीस दिल्लीत तपास करत राहिले. पोलिसांनी अमित सिंग याच्याकडे दोन वेळा चौकशी देखील केली होती. मात्र अमितने प्रियाला दिल्लीत जाणार्या ट्रेनमध्ये बसवले होते अशी थाप मारली. उत्तर प्रदेश पोलिसांना प्रियाच्या मोबाईलचे लोकेशन वसईत मिळाल्याने त्यांनी अमितकडे कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.
अन्य एका घटनेमध्ये विरारमधील एका मेडिकल दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर तिच्याच प्रियकराने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे . भविका गावड असं जखमी तरुणीचे नाव असून अक्षय पाटील असं आरोपी प्रियकराचे नाव आहे.
मुलगी विरार पूर्वेला मेडिकलमध्ये काम करत असताना आरोपी अक्षयने अचानक दुकानात प्रवेश केला. तेथील कैची घेऊन अक्षयने तरुणीच्या चेहऱ्यावर, मानेवर व छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
भविका आणि अक्षय हे दोघेही विरारच्या कोपरी गावात राहणारे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रेम संबंधात होते, मात्र मुलीचे दुसऱ्यासोबत प्रेम संबंध असल्याचा संशय अक्षयला होता. याचा राग मनात धरून अक्षयने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून आरोपी तरुणाने स्वतःला विरार पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. जखमी मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.