Asha Bhosle on Marathi Bhasha Din: मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेकडून (MNS) शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) अभिजात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यानिमित्ताने आयोजित उद्धाटन कार्यक्रमात आशा भोसले, जावेद अख्तर, अशोक सराफ, विक्की कौशल, आशुतोष गोवारीकर, रितेश देशमुख, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, लक्ष्मण उतेकर, सोनाली बेंद्रे यांच्यास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी मान्यवरांनी कविता वाचन केलं. आशा भोसले यांनीही यावेळी कविता वाचन केलं. तसंच 'केव्हा तरी पहाटे' या गझलेचा अर्थ सांगितला. तसंच मराठी भाषेसंबंधी बोलताना एक किस्सा सांगितला ज्यानंतर सर्वांना हसू अनावर झालं.
"मराठी भाषा इतकी गोड, लवचिक आहे. मधाचा थेंब कानात पडल्यानंतर ओघळत ह्रदयापर्यंत जाऊन पोहोचतो अशी ही भाषा आहे. या भाषेला दुधारी तलवारही आहे आणि अवधान जर नाही ठेवलं तर काहीही अर्थ निघून जातो. ऱ्हस्व, दीर्घ सगळं काही पाहावं लागतं. चार-पाच दिवसांपूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला. ते फार उत्साहात होते. ते मला त्यांच्या ठाकरे आवाजात म्हणाले, आशाताई मला तुम्ही 27 तारखेला काही झालं तर संध्याकाळी 6 वाजता हव्यात. मी त्यांना म्हटलं, '60 वर्षं उशीर झाला बरं का'. त्यावर त्यांनी काव्यवाचन करायचं आहे आणि जरुर यायचं आहे असं सांगितलं," असा किस्सा आशा भोसले यांनी सांगताच सर्वांना हसू अनावर झालं.
"राज ठाकरेंना नाही म्हणता येत नाही. ज्या माणसाने एका दिवसात माझ्या घऱात शिवाची इतकी मोठी पिंडी आणून बसवली. ज्या माणसाने कुठे जेवण मिळत नसताना 15 मोठे मासे पाठवले त्याला नाही कसं म्हणणार. ते आपले दोस्त आहेत. दोस्ताला आपण कधी नाही म्हणत नाही," असंही
आपलं मनोगत व्यक्त करताना आशा भोसले यांनी सांगितलं की, "आपल्याकडे दोन कोसावर भाषा बदलते. घाटावर गेलं की हळूहळू भाषा बदलत जाते. ती भाषा फार गोड असते. फक्त पुण्यात स्वच्छ भाषा ऐकायला मिळते. पुण्यात 75 टक्के आणि मुंबईत 25 टक्के शुद्ध भाषा राहिली आहे. मुंबईचं नाव मुद्दामून घेतलं, नाहीतर उद्या घराबाहेर 200 लोक येऊन आम्ही शुद्ध बोलत नाहीत का? असं विचारतील".
पुढे त्यांनी सांगितलं की, "वाचनामुळे भाषा शुद्ध होते. मराठी भाषा टिकवायची असेल तर आईने मराठीत बोललं पाहिजे. आई मुलाला संस्कार देते, भाषा शिकवते. जर आईच मराठी नसेल, किंवा समजत नसेल तर मुलगा मराठी कसा शिकणार? आजच्या जगात इंग्लिश हे फार महत्त्वाचं आहे. पण आपली मातृभाषा टिकवूनही इंग्रजी शिकता येतं. आईने बोलली तर मातृभाषा येईल. आजकाल मराठी लोक घऱात इंग्रजीच बोलतात. हे गुड मॉर्निंग....आता आई आणि मुलीने एकमेकीला सुप्रभात म्हणावं".
"मराठी शाळांमधून एक तास मराठी पुस्तक, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रसारखं त्याचं एक पान रोज वाचावं. हे पुस्तक आईकडेही पोहोच करावं. इंग्रजांनी लिहिलेला नाही तर आपला खरा इतिहास त्यांना कळला पाहिजे," असंही मत त्यांनी मांडलं.