40 हजारांसाठी जीव धोक्यात टाकून तस्करी; शरीरात अशा जागी लपवलं सोनं की विमानतळावरील अधिकारीही हैराण

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी विश्वातून अशा काही घटनांचं वृत्त समोर आलं की तपास यंत्रणांनाही हादरा बसला. असाच एक प्रकार नुकताच मुंबई विमानतळावर घडल्याचं पाहायला मिळालं.   

सायली पाटील | Updated: Feb 28, 2025, 08:27 AM IST
40 हजारांसाठी जीव धोक्यात टाकून तस्करी; शरीरात अशा जागी लपवलं सोनं की विमानतळावरील अधिकारीही हैराण
Mumbai news gold smuggler caught carrying gold in his own body know latest update

Mumbai News : विमानमार्गानं प्रवास करत असताना प्रवाशांच्या सामानाची आणि त्यांच्याकडे असणाऱ्या ऐवजाची कसून तपासणी होते. संशय आल्यास काही गोष्टींसंदर्भात प्रश्नसुद्धा उपस्थित केले जातात. पण, अनेकदा या यंत्रणेलाही तुरी देण्यात काही सराईत गुन्हेगार यशस्वी ठरतात. अशाच एका व्यक्तीला नुकतंच मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं. अतिशय थरारकरित्या विमानतळावर यंत्रणांनी ही सोनं तस्करी पकडून देत कोट्यवधींचा व्यवहार उघडकीस आणला. 

बँकॉकहून पत्नीसोबत मुंबईत आलेल्या मुळच्या गुजरातच्या एका प्रवाशाला मुंबई विमानतळावर सोनं तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागानं अटक केली. शरीरातून सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाअंतर्गत हा इसम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अटकेत असल्याचं सांगण्यात येत आहे. शरीरात तब्बल सव्वाकोटींचं सोनं लपवणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे मोहम्मद वासिफ शेख. 

सदर आरोपी, (26 वर्षी इसम) सोन्याची तस्करी करत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. ज्यानंतर शेखच्या प्रवासातील सर्व हालचालींवर यंत्रणांनी नजर ठेवली. तो आणि त्याची पत्नी ग्रीन चॅनलमधून बाहेर पडल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवत चौकशी सुरू केली. सीमाशुल्क भरण्यासारखं काही सामान आहे का, यासंदर्भातील विचारणा त्याला करण्यात आली. पण, इथं त्यानं तिथं नकारार्थी उत्तर दिलं. त्याच्या या उत्तरानं तपास यंत्रणांचं समाधान न झाल्यानं अखेर त्याची एक्स-रे चाचणी करण्याचं ठरवण्यात आलं. ज्याचा निकाल पाहून यंत्रणाही हादरल्या. या व्यक्तीनं  केली गुदद्वारामध्ये सोनं लपवल्याचं यातून उघड झालं. 

या तस्करीसाठी आपल्याला एक व्यक्ती 40 हजार रुपये देणार असल्याची माहिती शेखनं तपासादरम्यान दिली. या रकमेसाठी जीव धोक्यात टाकून सोन्याची तस्करी करणाऱ्या शेखच्या पत्नीवर मात्र गुन्हा नोंदवण्यात आला नाही. प्रत्यक्षात आरोपीच्या पत्नीच्या सामानातही सोनं सापडलं होतं. पण, या तस्करीत तिचा काहीही संबंध नाही अशी माहिती त्यानंच दिली. 

हेसुद्धा वाचा : Video: खऱ्याखुऱ्या सोन्याच्या 'बिया' असलेले खजूर पाहून अधिकारी थक्क; किंमत 13 लाख रुपये

 

आपण तिला एक पॅकेट देत ते बॅगेत ठेवण्यास सांगितलं, त्यामध्ये नेमकं काय आहे याची तिला कल्पना नव्हती असं शेखनं सांगितल्यानं पत्नीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही. ज्यानंतर अधिकाऱ्यांनी फक्त त्याच्यावरच तस्करीचा गुन्हा दाखल केला. 

विमानतळावर सोन्याच्या 'बिया' असलेले खजूर 

नुकतंच नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सोन्याची तस्करी चक्क खजुरातील बियांच्या रुपात केल्याची माहिती उघड झाली. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं. जिथं, एका व्यक्तीनं खजुराच्या बियांच्या जागी 14.75 तोळं सोनं आणत ही तस्करी केल्याचं तपासातून समोर आलं.