Swargate Rape Case UBT On Devendra Fadnavis: "पुण्यात कायदा-सुव्यवस्था आणि संस्कृतीचे धिंडवडे निघाले आहेत. राज्य शासनाच्या ‘शिवशाही’ बसमध्येच लाडक्या बहिणीवर बलात्कार केला आणि नराधम पसार झाला. बुधवारी पहाटे साडेपाच वाजता हा अतिप्रसंग घडला तेव्हा महाराष्ट्राचे सरकार नेहमीप्रमाणे झोपेतच होते. काही वर्षांपूर्वी दिल्लीत चालत्या बसमध्ये असेच निर्भया कांड घडले तेव्हा भारतीय जनता पक्षाने संसद ठप्प केली होती. दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलन सुरू केले होते. आज महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत, पण लाडक्या बहिणींना संरक्षण नाही. कारण राज्यात गुंडांना राजकीय संरक्षण लाभले आहे. पुण्यात खून, अपहरण, खंडणी, महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत. भररस्त्यात हाती कोयते व तलवारी नाचवत गुंड टोळ्या थैमान घालतात, हे कसले चित्र आहे?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
"स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये हे भयंकर कृत्य घडले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते तेथे जमले व त्यांनी स्वारगेट बस स्थानकावर हल्ला केला. तेथे अनेक बस उभ्या होत्या. त्यात काय आढळावे? दारूच्या बाटल्या, महिला-पुरुषांचे कपडे, कंडोम्स आणि इतर बरेच काही. याचा काय अर्थ घ्यायचा? एस.टी. व सरकारी परिवहन उपक्रम तोट्यात असल्याने या गाड्यांचे ‘कोठे’ बनवून चालवायला दिले आहेत काय व या अशा धंद्यांतून कोणी कमाई करीत आहे काय?" असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
"महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी तडकाफडकी 23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन केले. हे सुरक्षा रक्षक खासगी कंपनीचे होते व ही खासगी कंपनी भाजपशी संबंधित नेत्याचीच असायला हवी. प्रत्येक कामात पैसे खायचे म्हणजे खायचेच हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. त्याचाच परिणाम स्वारगेट बलात्कार प्रकरणात दिसला. बदलापूर, अंबरनाथ, ठाणे आणि आता पुण्यात स्वारगेटला मुलींवर हे असे अत्याचार झाले. लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिल्याने हे महिला अत्याचाराचे पाप धुऊन निघणार नाही. फडणवीसांचे सरकार महिला अत्याचाराबाबतीत गंभीर नाही," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'स्वारगेट'चा नेमका अर्थ काय? हे नाव आलं तरी कुठून? 10 पैकी 9 जणांना याची कल्पनाच नाही
"पूजा चव्हाण या महिलेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला तेव्हा मृत्यूस जबाबदार असलेल्या मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मागण्यात तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आघाडीवर होते. आज फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात तेच संजय राठोड सन्मानाने विराजमान झाले. फडणवीस यांचा महिलांसंदर्भातला आदर व चिंता खरी असती तर राठोडसारख्यांना त्यांनी मंत्रिमंडळात येऊच दिले नसते. त्यामुळे जे देवेंद्र फडणवीस पूजा चव्हाणला न्याय देऊ शकले नाहीत, ते इतर पीडित महिलांना काय न्याय देणार?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.