Pune Swargate Rape Case Accuse Arrested: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या 'शिवशाही' बसमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक करण्यात आली आहे. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे याला शिरूर तालुक्यातील एका गावातून पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रात्री एकच्या सुमारास आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्थानिक गावकरी आणि स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केलीय. तब्बल 75 तासांनी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे याला त्याच्या गुनाट गावच्या शिवारातूनच अटक करण्यात आली आहे. आरोपी एका शेतातील कॅनलच्या बाजूला झोपला असताना त्याला पकडण्यात आले. पुणे पोलिसांनी नराधम दत्तात्रय गाडे याला लष्कर पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. आज दुपारी 3 वाजता त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे 5.30 च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पुण्यात दुष्कृत्य करून आपल्या गावात परतला होता. संध्याकाळी पाचपर्यंत तो घरीच थांबला होता. आरोपी पुण्यात दुष्कृत्य करून आपल्या गावात सकाळी 11 वाजता पोहचला होता. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याने घरी विश्रांती घेऊन तो गावातच मुक्काम केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आरोपी शिरुरमध्येच शेतात लपला असल्याचा पोलिसांचा अंदाज खरा ठरला.
स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत आरोपी असल्याचे काही पुरावे पोलीस तपासादरम्यान समोर आले आहेत. काही राजकीय आणि पोलिसांच्या ही तो संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एसटी स्थानकांवर रेंगाळत तेथील मुली, तरुणींना आपण पोलिस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न त्याने यापूर्वी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दत्तात्रय गाडेवर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दत्ता गाडेवर शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडण्याचे गुन्हे त्यावर दाखल आहेत. 2021 मध्ये कर्ज काढून घेतलेल्या एका चारचाकीने तो पुणे-अहिल्यानगर मार्गावर प्रवासी वाहतूक करत होता. यावेळी त्याने अनेक महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटलं आहे. दत्ता गाडेच्या घरची परिस्थिती बेताची असून घरी आई-वडील, पत्नी, 2 मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे. पुणे पोलिसांनी स्वारगेट प्रकरणात दत्तात्रय गाडेचा भाऊ, पत्नी आणि आई यांचा जबाब नोंदवला आहे.