World Cup 2023: 'एक वाईट सामना अन् त्याला....', बुमराहबद्दल कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान

वर्ल्ड कपमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फॉर्मवर कर्णधार रोहित शर्माने भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 28, 2023, 12:32 PM IST
World Cup 2023: 'एक वाईट सामना अन् त्याला....', बुमराहबद्दल कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान title=

ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमरहाने एकूण तीन विकेट्स घेतले. बुमराह पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येणं ही भारतासाठी आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने मोठा दिलासा देणारी बाब आहे. बुमराहच्या कामगिरीवर कर्णधार रोहित शर्मा आनंदी आहे. बुमराह शारिरीकरित्या आणि मानसिकरित्या दोन्ही दृष्टीने उत्तम असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे. 

जसप्रीत बुमराह जखमी असल्याने बराच काळ भारतीय संघातून बाहेर होता. दुखापतीतून सावरल्यानंतर बुमराह पुन्हा एकदा भारतीय संघात सामील झाला असून, यामुळे मोठं पाठबळ मिळालं आहे. एखाद्या सामन्यात वाईट खेळला म्हणून त्याच्या गोलंदाजीवर परिणाम होत नाही असं रोहित शर्माने म्हटलं आहे. 

"मला फार आनंद आहे. खासकरुन बुमराह शारिरीकरित्या पूर्ण फिट आहे. त्याच्या प्रचंड कौशल्य आहे. एखाद्या सामन्यात वाईट खेळ हे प्रत्येकासह होऊ शकतं. पण त्याला शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या कसं वाटत आहे हे महत्त्वाचं आहे. आणि ते सध्या चांगलं दिसत आहे," असं रोहित शर्माने म्हटलं आहे. 

भारतीय संघाच्या वर्ल्डकपच्या तयारीबद्दल रोहित शर्मा प्रचंड समाधानी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या 66 धावांच्या पराभवाचा जास्त विचार करणार नसल्याचं म्हटलं आहे. वर्ल्डकपच्या संघात कोणते 15 खेळाडू असतील याबद्दल कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन स्पष्ट आहे. गुरुवारी 28 सप्टेंबरला अंतिम संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

"मागील 7 ते 8 सामन्यात वेगवेगळ्या परिस्थितीत खेळताना आम्ही चांगली कामगिरी केली. आम्हाला वेगवेगळी आव्हानं मिळाली आणि आम्ही त्यांचा फार चांगल्या प्रकारे सामना केला. दुर्दैवाने आम्हाला अपेक्षित असणारा निकाल आज लागला नाही. पण मी या सामन्याबद्दल जास्त विचार करणार नाही. आम्ही फार चांगले खेळत आहोत," असं रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यानंतर बोलताना सांगितलं.

रोहित शर्माने मागील काही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली असून, अर्धशतकं ठोकली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या सामन्यात त्याने 81 धावांची तुफानी खेळी केली. "मी माझ्या फॉर्मवरही प्रचंड आनंदी आहे. मैदानात जास्त वेळ टिकावं यासाठी प्रयत्न आहे. पण जोपर्यंत मी मोठे फटके लगावत आहे, तोपर्यंत आनंद आहे," असं रोहित शर्मा म्हणाला. 

अक्षर पटेलला दुखापत झाली असल्याने त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. त्याच्या जागी आर अश्विनला संघात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. "जेव्हा आपण 15 खेळाडूंबद्दल बोलत आहोत, तेव्हा संघात कोण असतील याबद्दल आम्ही स्पष्ट आहोत. आम्ही अजिबात गोंधळलेलो नाही. आम्ही काय करत आहोत हे आम्हाला माहिती आहे," असं रोहित शर्माने सांगितलं.