रोहित शर्माने भाड्याने दिला आपला करोडोंचा फ्लॅट, महिन्याला फक्त भाड्यातून करणार तब्बल इतक्या लाखांची कमाई

Rohit Sharma Property Net Worth: रोहित शर्माचं हे अपार्टमेंट मुंबईतील लोअर परेलमध्ये आहे. 'लोढ़ा मार्कीज़ - द पार्क' प्रोजेक्टमध्ये हे निवासस्थान आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 27, 2025, 08:05 PM IST
रोहित शर्माने भाड्याने दिला आपला करोडोंचा फ्लॅट, महिन्याला फक्त भाड्यातून करणार तब्बल इतक्या लाखांची कमाई

Rohit Sharma Mumbai Property: भारतीय संघातील अनेक खेळाडू श्रीमंत असून, त्यांनी फक्त क्रिकेटच्या माध्यमातून करोडोंची संपत्ती कमावली आहे. पण यानंतर आता आर्थिक नफा कमावण्यासाठी ते फक्त क्रिकेटवर अवलंबून राहत नसून, इतर गोष्टींमध्येही गुंतवणूक करत आहेत. यामधील एक क्षेत्र म्हणजे रिअल इस्टेट आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. रोहित शर्माने नुकतंच मुंबईतील लोअर परेलमध्ये असणारं आपलं अपार्टमेंट भाड्याने दिलं आहे. या अपार्टमेंटसाठी रोहित शर्माला महिन्याला 2.6 लाख भाडं मिळत आहे. 

रोहित शर्माचं हे अपार्टमेंट मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लोअर परेलमध्ये आहे. हे 'लोढा मार्क्विस - द पार्क' प्रकल्पाचा एक भाग आहे. हे मॅक्रोटेक डेव्हलपर्स (लोढा ग्रुप) ने विकसित केले आहे. हा ७ एकर जागेत पसरलेला एक रेडी-टू-मूव्ह निवासी प्रकल्प आहे.

लोअर परळ हे कर्मशिअल हब

लोअर परळ हे मुंबईचे एक प्रमुख निवासी आणि व्यावसायिक केंद्र आहे. हे शहरातील प्रमुख ठिकाणं जसं की वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि नरिमन पॉइंटशी जोडलेलं आहे. यामुळे, हा परिसर आलिशान अपार्टमेंट आणि उच्च दर्जाच्या सुविधांसाठी ओळखला जातो.

या अपार्टमेंटचा एकूण कार्पेट एरिया 1298 चौरस फूट आहे. यामध्ये दोन कार पार्किंगची जागा देखील आहे. या भाडे करारासाठी 16 हजार 300 रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि 1000 रुपयांचं नोंदणी शुल्क भरण्यात आलं आहे. हा करार जानेवारी 2025 मध्ये नोंदणीकृत झाला.

रोहित शर्माने कधी केली खरेदी?

रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांनुसार, रोहित शर्मा आणि त्याचे वडील गुरुनाथ शर्मा यांनी मार्च 2013 मध्ये 5 कोटी 46 लाखांना हे अपार्टमेंट खरेदी केलं होतं. सध्या, या मालमत्तेचे मासिक भाडे 2.6 लाख रुपये आहे, ज्यामुळे या मालमत्तेचे भाडे उत्पन्न सुमारे सहा टक्के होते.

रोहित शर्मा आणि त्याच्या वडिलांचे लोढा मार्क्विसमध्ये आणखी एक अपार्टमेंट आहे. हे घर त्यांनी 2013 मध्ये 5 कोटी 70 लाखात खरेदी केलं होतं. हे अपार्टमेंट ऑक्टोबर 2024 मध्ये 2.65 लाख रुपये प्रति महिना या दराने भाड्याने देण्यात आलं होतं.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले आहे. 2013 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2018 च्या आशिया कपमध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2015  मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार आणि 2020 मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.