गुप्तांगाला 28 टाके, डोक्याला इजा, शरीराचे लचके; 17 वर्षीय मुलाचा 5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, आई म्हणाली 'गोळ्या घाला'

चिमुरडीवर दोन तास ऑपरेशन केल्यानंतर तिची प्रकृती स्थिर करण्यात आली. पण अद्यापही मुलीच्या जीवाला धोका आहे. मुलगी शुद्धीत आली असली तरी तिने या घटनेनंतर एकही शब्द उच्चारलेला नाही.   

शिवराज यादव | Updated: Feb 27, 2025, 09:27 PM IST
गुप्तांगाला 28 टाके, डोक्याला इजा, शरीराचे लचके; 17 वर्षीय मुलाचा 5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, आई म्हणाली 'गोळ्या घाला'

मध्य प्रदेशात एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चिमुरडी सध्या मृत्यूशी संघर्ष देत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अल्पवयीन असून फक्त 17 वर्षांचा आहे. आरोपी अत्यंत हिंसकपणे अत्याचार केला असून, सीमाच गाठल्या आहेत. ग्वालियरच्या कमला राजा रुग्णालयात मुलीला दाखल करण्यात आलं आहे. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गुप्तांगाला 28 टाके मारण्यात आले आहेत. तसंच कोलोस्टोमीसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार केले तेव्हा आरोपी दारुच्या नशेत होता. त्याने अनेक वेळा चिमुरडीचं डोकं भिंतीवर आपटलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्या आहेत. याशिवाय तिचं शरीर, गुप्तांग येथे अनेक ओरखडे आणि चावा घेतल्याचा खुणा आहेत.

मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी डॉक्टरांना दोन तास ऑपरेशन करावं लागलं. यानंतरही तिची प्रकृती नाजूक आहे. मुलगी शुद्धीत आली असली तरी तिने या घटनेनंतर एकही शब्द उच्चारलेला नाही. या घटनेला आता पाच दिवस झाले आहेत. पण अद्यापही मुलगी मानसिक धक्क्यात आहे.
  
चिमुरडी शिवपुरी येथे वास्तव्यास आहे. 23 फेब्रुवारीला मुलगी बेपत्ता झाली होती. जवळपास दोन तासांनी मुलगी शेजारी एका गच्चीवर आढळली होती. यावेळी ती बेशुद्ध आणि रक्ताच्या थारोळ्यात होती. 

या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांमध्ये संताप असून त्यांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्याला रस्त्यावर सर्वांदेखत गोळ्या घालाव्यात अशी मागणी तिच्या आईने केली आहे. 

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट आहे. स्थानिक आणि राजकीय पक्षांनी येथे आंदोलनही केलं आहे. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची आणि आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. नेत्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केलं आहे.