Team India : टीम इंडियासाठी सेमीफायनलचा रस्ता झाला सोपा; फक्त करावं लागणार 'हे' काम

Team India Semi Final Equation: सध्या पॉईंट्स टेबलवर टीम इंडिया ( Team India ) अग्रस्थानी आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे, याची माहिती घेऊया. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 16, 2023, 11:25 AM IST
Team India : टीम इंडियासाठी सेमीफायनलचा रस्ता झाला सोपा; फक्त करावं लागणार 'हे' काम title=

Team India Semi Final Equation: वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाची ( Team India ) उत्तम कामगिरी दिसून येतेय. आतापर्यंत टीम इंडियाने 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. नुकतंच झालेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान ( IND vs PAK ) या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. त्यामुळे सध्या पॉईंट्स टेबलवर टीम इंडिया ( Team India ) अग्रस्थानी आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे, याची माहिती घेऊया. 

टीम इंडियाची चांगली कामगिरी

भारतीय टीमने वर्ल्डकप 2023 च्या पहिल्याच सामन्यात 5 वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने राखून पराभव केला होता. यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारताची उत्कृष्ट कामगिरी कायम राहिली. भारताने अफगाणिस्तानचा सामना 8 विकेटने जिंकला. त्यानंतर पाकिस्तानशी झालेल्या सामन्यात 7 विकेटने विजय मिळवला. तीन सामन्यात विजय मिळवल्याने टीम इंडियाचे सहा पॉईंट्स झाले आहेत.

सेमीफायनलपासून टीम इंडिया ( Team India ) किती पावलं दूर?

यंदाचा वर्ल्डकप हा राउंड-रॉबिन पद्धतीने खेळवला जातोय. साखळी सामन्यांनंतर पॉईंट्स टेबलमध्ये असणाऱ्या अव्वल 4 टीम थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहेत. टीम इंडियाने ( Team India ) विजयाची हॅट्ट्रिक साधली असली तरी सेमीफायनल गाठण्यासाठी त्यांना आणखी 4 विजय नोंदवावे लागणार आहेत. 

वर्ल्डकपच्या स्पर्धेमध्ये आगामी काळात टीम इंडियाला अजून 6 सामने खेळायचे आहेत, त्यापैकी जर टीमने 4 सामने जिंकले तर तो कोणत्याही अडचणीशिवाय सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. 

टीम इंडिया 'या' देशांविरूद्ध उतरणार मैदानात

टीम इंडियाला पुढील 6 सामने बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका तसंच नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहेत. भारताप्रमाणेच या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकंही सामना न हरलेल्या न्यूझीलंडविरुद्ध टीमचा सर्वात मोठा सामना होणार आहे. न्यूझीलंडने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडही भारताला कडवं आव्हान देऊ शकतात.