Raju Shetti : चळवळ आणि राजकारण यांची सांगड घालता आली नाही तर त्याचं काय होतं याचे उदाहरण म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी. चळवळ उभी करत असताना सोबतचे नेते आणि कार्यकर्त्यांना सांभाळता न आल्यामुळे चळवळीचा योद्धा असणारे राजू शेट्टी सध्या राजकारणात एकाकी पडलेत. ज्यांनी निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानीचा झेंडा हातात घेतला ते सुद्धा आता स्वाभिमानीला राम राम करताहेत.
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये अनेकांची नावं अग्रक्रमाने घ्यावी लागतील. त्यामध्ये शेतकऱ्यांचा कैवारी. शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळवून देणारा नेता. अशी ओळख संपूर्ण देशभर असणाऱ्या राजू शेट्टीचे नाव अग्रक्रमांकावर येतं. मात्र राजकारण करत असताना चळवळ आणि राजकारण यांची शेट्टी यांना सांगड घालता आली नाही असा आरोप राजू शेट्टी यांचे चळवळीतील जुन्या शिलेदारांनी केलाय.
ताज उदाहरण म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेट्टी यांनी आपल्या खाद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला डावललं आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आलेल्या सुजित मिणचेकर यांना उमेदवारी दिली. पण आत्ता याच सुजित मिनचेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यावरून राजू शेट्टींवर त्यांच्या माजी सहकाऱ्यांनी टीका केलीय.
राजू शेट्टींची आतापर्यंत किती जणांनी सोडली साथ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना आतापर्यंत सोडून गेलेल्या नेत्यांची यादी खूपच मोठी आहे. ज्यामध्ये सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर, देवेंद्र भुयार, प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, विकास देशमुख, सयाजी मोरे, वैभव कांबळे, सावकार मादनाईक, भाऊ साखरपे आणि सागर शंभूशेटे यांच्या सारख्या चळवळीतल्या कट्टर शिलेदारानी साथ सोडली.
राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उठविलेल्या आवाजामुळे त्यांना स्वताला अनेक निवडणुकांमध्ये मोठं यश आलं. मात्र यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना यश आलं नाही. एकीकडे शेट्टी राजकारणात अपयशी झाले असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारा नेता ही त्यांनी ओळख कायम आहे. मात्र असं असलं तरी सोबत असणारे बिनीचे शिलेदार आपल्याला का सोडून जातात याचं उत्तर मात्र राजू शेट्टींना सोडावे लागणाराय.