Namdev Dhasal Chal Halla Bol : 'चल हल्ला बोल' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची नोटीस पाठवलीय. चित्रपटातून कवी नामदेव ढसाळ यांची कविता हटवण्याची सूचना सेन्सॉरनं चित्रपटाच्या टीमला केली आहे. तसेच कविता हटवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी मिळणार नसल्याचंही स्पष्ट केल आहे. दरम्यान, सेन्सॉरच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सेन्सॉर बोर्डाने मराठीचा अपमान केला असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी देखील केलाय.
विद्रोही कवी म्हणून नामदेव ढसाळांची ओळख होती. प्रस्थापितांना आपल्या कवितांच्या माध्यमातून सवाल विचारणाऱ्या ढसाळांच्या कवितांचं सेन्सॉर बोर्डालाही वावडं आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय. 'चल हल्ला बोल' या मराठी चित्रपटातील नामदेव ढसाळांच्या कवितेला सेन्सॉरनं कात्री लावली आहे.
या सगळ्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. कवी नामदेव ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेणं हा त्यांच्या कवितांचा आणि मराठी भाषेचा अपमान असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी देखील या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 'चल हल्लाबोल हा सिनेमा 1975च्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर आधारित आहे. त्यामुळं सेन्सॉरनं कविता कापण्याविषयी नोटीस का पाठवली याबाबत सेन्सॉरशी चर्चा करणार', असल्याचं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय.
विस्थापितांचा आवाज असलेल्या नामदेव ढसाळांच्या कविता सेन्सॉरला का आक्षेपार्ह वाटल्या याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सेन्सॉर बोर्डाला नामदेव ढसाळ माहिती नाही का? असा प्रश्न साहित्य आणि सामाजिक वर्तुळातून विचारला जातोय.
‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट ढसाळ यांच्या चळवळीतील योगदान आणि त्यांच्या कवितांवर आधारित आहे. सेन्सॉर बोर्डाला त्यांच्या कवितांतील प्रखरता आणि सामाजिक संदेश खटकले आहेत. या सगळ्यावर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या कविता चित्रपटातून काढाव्या लागणार आहे.
हेही वाचा : 'मी मुंबई किंवा भारतात पोहत नाही'; सोनाक्षी सिन्हाने सांगितलं कारण, 'मला भितीये की माझा...'
या सगळ्या प्रकरणाविषयी बोलताना दिग्दर्शक आणि निर्माते महेश बनसोडे म्हणाल आहेत. 'नामदेव ढसाळ यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे. त्यांच्या कविता हा चित्रपटाचा आत्मा आहेत.' दरम्यान आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आणि खरंच कविता काढल्या जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.