ST Fare Hike: सर्वसामान्यांसाठी लाईफलाईन असणाऱ्या एसटीचा प्रवास महागला आहे. एसटी बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्यात आली आहे. हकिम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडलाने वाहतूक सेवांच्या भाडेदरात 14.95 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. ही भाडेवाढ 25 जानेवारीपासून लागू केली जाणार आहे. याआधी 26 ऑक्टोबर 2021 रोजी भाडेवाढ करण्यात आली होती. दरम्यान भाडेदरात वाढ झाल्याने आता नवे दर कसे असतील हे जाणून घ्या.
महामंडळाने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्याने तसंच महागाई भत्त्यात वाढ झाल्याने आपोआप भाडेवाढ सुत्रानुसार उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी 1 जानेवारी 2025 रोजी परिवहन महामंडळाच्या बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
एसटीमधून प्रवास करता प्रति टप्पा 6 किमीसाठी भाडं आकारलं जातं. साध्या बसचे सध्याचे भाडे 8.70 रुपये आहे, ते आता 11 रुपये असेल. जलद सेवा (साधारण) आणि रात्र सेवा (साधारण बस) याचंही भाडं सारखंच असेल. निम आरामसाठी 11.85 रुपयांऐवजी 15 रुपये मोजावे लागतील.
शिवशाही (एसी) बसंच भाडं 12.35 वरुन 16 रुपये झालं आहे. तर शिवशाही स्लिपरसाठी (एसी) 17 रुपये मोजावे लागणार आहे. तसंच शिवनेरीचं (एसी) भाडं 18.50 ऐवजी 23 रुपये झालं आहे. तसंच शिवनेरी स्लिपरचं भाडं 28 रुपये आहे.
- काळी-पिवळी मीटर टॅक्सीसाठी (सीएनजी) पूर्वीचे प्रति कि.मी. रुपये 18.66 वरून रुपये 20.66 भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रूपये 28 वरून रुपये 31 भाडेदर असणार आहे.
- कुल कॅबसाठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये 26.71 वरून रुपये 37.2 (20 टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता कुल कॅबसाठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रुपये 40 वरून रुपये 48 रुपये भाडेदर असणार आहे.
- ऑटोरिक्षासाठी (सीएनजी) पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये 15.33 वरून रुपये 17.14 रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रूपये 23 वरून रूपये 26 रुपये भाडेदर असणार आहे.
सदर भाडेदर सुधारणा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील सर्व काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांना लागू राहील. 1 फेब्रुवारीपासून नवीन दर लागू होतील.