Champions Trophy 2025 : 2017 नंतर तब्बल 8 वर्षांनी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Champions Trophy 2025) आयोजन केले आहे. 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार असून ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल पद्धतीने पाकिस्तान आणि दुबई या दोन देशांमध्ये खेळवली जाईल. यापूर्वी फक्त पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद होते मात्र टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास भारत सरकार तयार नसल्याने आता भारताचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. परंतु आता चॅम्पियन्स ट्रॉफीला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियानंतर भारताच्या एका अंपायरने देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिलाय.
पीटीआयने बीसीसीआयच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ही माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन मेमन यांनी वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतला असून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल म्हणजेच आयसीसीने बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 सदस्यीय अधिकाऱ्यांची घोषणा केली. याप्रकारे आयसीसी एलिट पॅनलमध्ये सामील असणारे एकमेव अंपायर नितीन मेनन यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याची माहिती मिळतेय. 15 सदस्यीय अधिकाऱ्यांच्या या टीममध्ये 3 मॅच रेफरी आणि 12 अंपायर्सचा समावेश आहे.
हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार बदलणार? स्पर्धा सुरु होण्यापूर्वी 'या' बलाढ्य संघात मोठ्या हालचाली
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघांचा समावेश असून यात एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत. यात संघांना दोन - दोन च्या गटात विभागले गेले असून एका गटात 4 संघ आहेत. ग्रुप ए मध्ये पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश तर ग्रुप बी मध्ये दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड यांचा समावेश आहे. एका ग्रुपमधील दोन संघ हे सेमी फायनलसाठी क्वालिफाय करतील तर सेमी फायनलमध्ये जिंकणारे संघ विजेतेपद जिंकण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळतील. 9 मार्च रोजी फायनल सामना खेळवण्यात येणार असून या दिवशी सामना खेळवण्यात अडचणी आल्यास 10 मार्च रोजी फायनल सामना खेळवला जाईल.