Pune Budhwar Peth History : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी पुणे शहराची ओळख. पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. पुणे जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पुण्यातील प्रत्येक भागाचा एक इतिहास आहे. यापैकीच एक आहे पुण्यातील बुधवार पेठ. औरंगजेबने ही पुण्यातील 'बुधवार पेठ वसवली. या भागाला 'बुधवार पेठ' नाव कसे पडले? 'बुधवार पेठ'चे जुने नाव माहित आहे का? जाणून घेऊया 'बुधवार पेठ'चा इतिहास.
पुणे शहरातली बुधवार पेठ ही रेड लाईट एरियामुळे जास्त चर्चेत असते. इथं देहविक्रीचा व्यवसाय चालतो. पुस्तकांच्या बाजारपेठेमुळे देखील बुधवार पेठ प्रसिद्ध आहे. येथे मोठी व्यापारी दुकाने आहेत. या परिसरात नेहमीच मोठी गर्दी असते. बुधवार पेठ परिसराला खूप मोठा इतिहास आहे. या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहेत.
साधारणपणे सव्वादोनशे वर्षापूर्वी पेशव्यांच्या काळात या परिसराला बुधवार पेठ असे नाव मिळाले. सोळाव्या शतकात औरंगजेब पुण्याला आला. औरंगजेबच्या काळात सध्याचा बुधवार पेठ परिसर मोहियाबाद म्हणून ओळखला जायचा. यानंतर 17 व्या शतकात साधारण 1730 साली थोरले बाजीराव पेशवा पुण्यात कायमचे मुक्कामी आले. व्यापाराला उत्तेजन देण्यासाठी येथे नवीन पेठांची स्थापन केली. त्यामुळे त्यांनी या मोहियाबादची पुनर्व्यवस्था करून बुधवार पेठ वसवली. पेशव्यांच्या काळात या भागात फक्त धान्य बाजार भरत होता. मात्र, येथील एका भागात कलावंतीनींचे नृत्याचे कार्यक्रम व्हायचे. यानंतर ब्रिटाशांच्या काळात येथे हळू हळू रेड लाईट एरिया तयार झाला. आजही बुधवार पेठेतील काही भागात वेश्याव्यवसाय चालतो. या भागात दर बुधवारी बाजार भरायचा म्हणून हा परिसर बुधवार पेठ नावाने ओळखला जाऊ लागला.