चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार बदलणार? स्पर्धा सुरु होण्यापूर्वी 'या' बलाढ्य संघात मोठ्या हालचाली

Champions Trophy 2025 : तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात एकूण 8 संघांनी सहभाग घेतलाय.

पुजा पवार | Updated: Feb 5, 2025, 02:08 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार बदलणार? स्पर्धा सुरु होण्यापूर्वी 'या' बलाढ्य संघात मोठ्या हालचाली  title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असताना यात सहभागी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप चॅम्पियन संघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स हा चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy 2025) मुकण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या हेड कोचने स्वतः याबाबत माहिती दिली असून पॅट कमिन्सच्या (Pat Cummins)  अनुपस्थितीमुळे स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ किंवा ट्रेव्हिस हेड यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. 

काय म्हणाला ऑस्ट्रेलियाचा हेड कोच? 

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड याने सांगितले की कर्णधार पॅट कमिन्स हा पायाच्या घोटाला झालेल्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अनुपस्थित राहू शकतो. कमिन्सची पत्नी दुसऱ्या मुलाला जन्म देणार असल्याने कुटुंबाला वेळ देण्यासाठी कमिन्सने अश्रीलंके विरुद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यातून माघार घेतली आहे. तसेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान कमिन्सच्या पायाच्या घोटाळा झालेली दुखापत अजूनही बरी झालेली नाही. त्यामुळे कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ किंवा ट्रॅव्हिस हेड हे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करू शकतात. 

ड्र्यू मॅकडोनाल्ड  म्हणाला की, 'पॅट कमिन्स कोणत्याही प्रकारे गोलंदाजी पुन्हा सुरू करू शकले अशी शक्यता वाटत नाही. याचा अर्थ असा की ऑस्ट्रेलियाला कर्णधाराची गरज आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड हे दोन संघाचं नेतृत्व करू शकतील असे आहेत. त्यांच्याशी आम्ही संभाषण करत आहोत'. कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिप 2023 , वनडे वर्ल्ड कप 2023 , बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024 -25  इत्यादी स्पर्धा जिंकल्या आहेत.   

हेही वाचा : टीम इंडियात 'हा' खेळाडू नसेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यता 30 टक्क्यांनी कमी होतील, रवि शास्त्रीचं भाकीत

 

ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूंनाही दुखापत : 

कर्णधार पॅट कमिन्सच नाही तर ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू देखील सध्या दुखापतग्रस्त आहेत. जोश हेझलवुड याच्या देखील उपलब्धतेबाबत शंका आहे. हेझलवुड सध्या हिपला झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त आहे त्यामुळे तो भारत आणि श्रीलंका विरुद्ध सीरिजमधून बाहेर राहिला. तर ऑस्ट्रेलियाचा अजून एक खेळाडू मिचेल मार्श हा सध्या पाठीच्या समस्येमुळे त्रस्त असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे. तसेच तो देशांतर्गत क्रिकेट आणि आगामी आयपीएल सीजन खेळेल की नाही यावर देखील शंका आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफीचे दोन ग्रुप : 

ग्रुप ए - पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश
ग्रुप बी - दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड