वाल्मिक जोशी आणि ओम देशमुख (प्रतिनिधी) मुंबई/ जळगाव : राज्याच्या राजकारणात मागील 10 वर्षांपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांचा संघर्ष चांगलाच गाजला होता. 2014 ला देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आणि या संघर्षाची ठिणगी पडली. त्यानंतर या संघर्षात मोठा भडका उडाल्याचंही पाहायला मिळालं होतं. मात्र आता राज्यातील या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाईच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची सागर बंगल्यावर बैठक झाली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे त्याच्या दिलजामाईची चर्चा जोर धरू लागलीये. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता फडणवीस आणि खडसेंमध्ये भेट झालीय. 2014 ला एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्रीपदाची संधी फडणवीस यांना मिळाली आणि या फडणवीस - खडसे यांच्या संघर्षाला सुरूवात झाली. पुढे हा संघर्ष अधिक तीव्र होत गेला. एकनाथ खडसेंनी तर भाजपमध्ये असतानाही फडणवीसांवर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष टीका केली. तर भाजप सोडताना थेट फडणवीसांवर आरोपांच्या फैरी झाडत खडसेंनी भाजपला रामराम ठाकला होता.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातला हा संघर्ष मागील 10 वर्षांपासून कायम आहे. आता दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानं दिलजमाई होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र मागील दहा वर्षात एकनाथ खडसेंनी अनेकदा फडणवीसांवर जोरदार निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. पक्ष सोडताना फडणवीस यांच्यामुळेच आपण पक्ष सोडत असल्याचं खडसेंनी म्हटलं होतं.
भाजप सोडताना खडसे काय म्हणाले होते?
देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझी नाराजी आहे. मला खूप त्रास दिला गेला. मी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडतोय असं एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताना म्हटले होते. मात्र आपण मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलंय.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून एकनाथ खडसे हे भाजप प्रवेशासाठी रांगेत आहेत. दिल्लीकून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर राज्यातून रेड सिग्नल मिळाला आणि खडसेंचा भाजप प्रवेश रखडला.. मात्र आता पुन्हा एकदा खडसेंच्या घरवापसीच्या चर्चा सुरू झालेत. फडणवीस-खडसेंच्या भेटीनंतर मात्र या चर्चांना बळ मिळाल्याचं पाहायला मिळतंय.. त्यामुळे खडसेंना फडणवीसांचा ग्रीन सिग्नल मिळणार का? हे पाहावं लागेल.