मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याने सुरेश धसांना बुस्टर, धनंजय मुंडेंची दांडी; बीडचे राजकारण कुठे जाणार?

Beed: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बीड दौऱ्याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 5, 2025, 09:10 PM IST
मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याने सुरेश धसांना बुस्टर, धनंजय मुंडेंची दांडी; बीडचे राजकारण कुठे जाणार? title=
फडणवीसांचा बीड दौरा

Beed: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीडचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात भव्य मेळावा पार पडला. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. महायुतीच्या मंत्र्यावर एकीकडे धस आरोप करताहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री धस यांच्या मतदारसंघात मेळाव्याला उपस्थित राहताहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे सुरेश धसांना बुस्टर मिळाल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बीड दौऱ्याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्य़मंत्र्यांचा हा दौरा म्हणजे धस यांनी पाठबळ असल्याचं बोललं जातंय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात बीड जिल्ह्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय.

भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. डीपीडीसीच्या निधीचा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा, आकाचा आका कोण असे अनेक सवाल उपस्थित करत. धनंजय मुंडेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्याच सुरेश धसांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावल्याने जोरदार चर्चा सुरू झालीय. त्यामुळे धस यांना मुख्यमंत्र्यांचं पाठबळ असल्याची चर्चा सुरू झालीय. आष्टीतील या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच आमदार सुरेश धस यांनी बीडच्या जंगलराजवर निशाणा साधलाय. तर संतोष देशमुख हत्या प्रकणातील कारवाईबद्दलही धस यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले

संतोष देशमुख हत्येसारख्या घटना खपवून घेणार नाही. दोषींवर कठोर कारवाई होणार अशा शब्दांत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टीमध्ये आपली भूमिका ठामपणे मांडलीय. 

आष्टीतील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधुनिक भगिरथ असा उल्लेख करत सुरेश धसांच्या कामाचं कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आष्टीतील कार्यक्रमाला मंत्री धनंजय मुंडे यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं.

धनंजय मुंडे हे या कार्यक्रमाला दांडी मारतील अशी शक्यता आधीच वर्तवली जात होती. मात्र धनंजय मुंडे हे फडणवसींच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. तरीही फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार सुरेश धस मुंडेंवर आरोपांची मालिक कायम ठेवतात. आणि मुख्यमंत्री फडणवीस धसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. त्यामुळे हा सुरेश धसांसाठी मोठा बुस्टर असल्याची बोललं जातंय.