'आता उपोषण नाही, तर...', मनोज जरांगेंचा राज्य सरकारला जाहीर इशारा, म्हणाले, 'गोड बोलून समजत नाही, त्यामुळे...'

सरकारला गोड बोलून समजत नाही, त्यामुळे आता लढायचं असं जरांगे म्हणत आहेत. 

शिवराज यादव | Updated: Feb 5, 2025, 08:37 PM IST
'आता उपोषण नाही, तर...', मनोज जरांगेंचा राज्य सरकारला जाहीर इशारा, म्हणाले, 'गोड बोलून समजत नाही, त्यामुळे...'  title=

तब्बल सातवेळा उपोषणाला बसल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी रणनीती बदलली आहे. आता उपोषण नाही, लढायचं असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं आहे. सरकारला गोड बोलून समजत नाही, त्यामुळे आता लढायचं असं जरांगे म्हणत आहेत. 

मराठा आरक्षणासाठी सातव्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सरकारनं दखल घेतली नाही. कोणत्याही तोडग्याशिवाय मनोज जरांगे पाटलांना त्यांचं उपोषण सोडावं लागलं. मराठा आरक्षणासाठी आता मनोज जरांगे पाटलांनी त्यांची रणनिती बदलली आहे. यापुढं उपोषणाऐवजी उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईत धडक देण्याच्या विचारात असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. पुढच्या काळात मुंबईत आझाद मैदान आणि शिवाजीपार्क मैदानाची आंदोलनासाठी चाचपणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणाबाबत सरकारनं चालढकल सुरु केल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. मराठा समाज आता थांबणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटलांनी उपोषणास्त्र म्यान केलंय. मग आता मनोज जरांगे पाटील नेमकं कोणत्या प्रकारचं आंदोलन करणार किंवा त्यांचं आंदोलन कोणत्या प्रकारचं असणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलीये.