Abhishek Bachchan Birthday: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानित्ताने मनोरंजनसृष्टीतून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यादरम्यान अभिषेकची पत्नी ऐश्वर्या रायने इंस्टाग्रामवर त्याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्या रायने इंस्टाग्रामवर अभिषेक बच्चनचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तसंच निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनला लहानपणीचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "तुला आनंद, चांगले आरोग्य, प्रेम आणि प्रकाशासह वाढदिवसाच्या शुभेच्छा".
ऐश्वर्या मागील बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. दुसरीकडे अभिषेक बच्चन नुकताच शुजित सरकारच्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याने एका वडिलांची भूमिका केली होती जो अभूतपूर्व वैद्यकीय आणीबाणीचा सामना करतो ज्यामुळे त्याच्या जीवनात उलथापालथ होते.
गेल्या वर्षी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य विवाह सोहळ्यातही हे जोडपे दिसले होते. दोघे स्वतंत्रपणे लग्नासाठी पोहोचले होते. मात्र कार्यक्रमात एकत्र दिसले होते. यानंतरच त्यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण दोघांनीही अधिकृतपणे त्यावर कधीच भाष्य केलेलं नाही.
दरम्यान, ऐश्वर्याचा शेवटचा चित्रपट पोनियिन सेल्वन सीरिजने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटात चियान विक्रम, रवि मोहन, शोभिता धुलिपाला, त्रिशा कृष्णन, कार्ती आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांच्याही भूमिका होत्या.
गेल्या वर्षीच्या सुरुवातीला, CNBC-TV18 शी बोलताना, अभिषेकने त्याच्या आणि ऐश्वर्यामधील तुलनांबद्दल सांगितलं होतं. "हे कधीच सोपं होणार नाही याची मला कल्पना आहे. "परंतु 25 वर्षांनी हाच प्रश्न विचारला गेल्यानंतर, मी त्यापासून इम्युन झालो आहे", असं त्याने म्हटलं होतं.
"तुम्ही माझी तुलना माझ्या वडिलांशी करत असाल, तर तुम्ही माझी तुलना सर्वोत्कृष्टांशी करत आहात. आणि जर माझी तुलना सर्वोत्कृष्ट व्यक्तींशी केली जात असेल, तर कदाचित मी या महान नावांसोबत विचार केला जाण्यास पात्र आहे," असंही तो म्हणाला होता. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला 18 वर्षं झाली आहेत. त्यांना आराध्या बच्चन नावाची मुलगी आहे.