Delhi Assembly Election 2025 : भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Election 2025) बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. सर्व 70 जागांसाठी झालेल्या या मतदानात विविध पक्षांच्या उमेदवाराचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. आता ही मतपेटी 8 फेब्रुवारी रोजी उघडण्यात येणार असून यातून दिल्लीच्या जनतेनं कोणाला मत रुपी आशीर्वाद दिलाय हे स्पष्ट होईल. मात्र आता मतदान झाल्यावर अनेक एक्झिट पोल समोर येत असून यामाध्यमातून दिल्लीत नेमकी कोणाची सत्ता येणार? याचा अंदाज लावला जात आहे. पोल डायरी आणि पीपल्स इनसाइट्स या लोकप्रिय एक्झिट पोलचे दिल्ली विधानसभा निवडणुकीविषयीचे आकडे समोर आले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत समोर येत असलेल्या एक्झिट पोलमधून आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येतंय. दिल्ली विधानसभा निवडणूक एकूण 70 जागांसाठी लढवली जात असून यातील बहुमताचा आकडा हा 36 आहे. पोल डायरी एक्झिट पोलनुसार भाजपला 40 ते 45 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर आम आदमी पक्षाला 18 ते 25 जागा मिळताना दिसत आहेत. तर कधीकाळी दिल्लीची गादी सांभाळलेल्या काँग्रेसच्या 0-2 जागा येण्याची शक्यता आहे.
आप - 18-25
भाजप - 42-45
काँग्रेस - 00-02
पीपल्स इनसाइट्स एक्झिट पोलमधून समोर येणाऱ्या अंदाजानुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच मुसंडी मारणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पीपल्स इनसाइट्सनुसार दिल्लीत आम आदमी पक्षाच्या 25 ते 29 जागा येतील. तर बहुमताचा आकडा गाठणार असल्याचं दिसतंय. भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत 40 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या 0-1 जागा येऊ शकतील.
आप - 25 -29
भाजप - 40 -44
काँग्रेस - 0-1
जर मागील तीन विधानसभा निवडणुकांवर नजर टाकली तर यामध्ये आम आदमी पक्षाची म्हणजेच 'आप' पक्षाची खरी ताकद अचूकपणे मोजण्यात एक्झिट पोल अपयशी ठरले आहेत. 2013 च्या निवडणुकीत त्रिशंकू विधानसभा येण्याचा अंदाज एक्झिट पोलने अचूकपणे वर्तवला होता, परंतु 2015 आणि 2020 च्या निवडणुकीत 'आप'च्या मोठ्या विजयाचा अंदाज ते अचूकपणे वर्तवू शकले नाहीत.