Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) पाकिस्तान आणि दुबई येथे हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार असून भारताचे सर्व सामने हे दुबईत होतील. तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून आयोजित करण्यात येत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजेत्यांच्या रकमेत 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता विजेत्या संघाला 22 लाख 40 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 20 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच उपविजेत्या संघावर देखील पैशांचा पाऊस पडणार असून त्यांना देखील 11 लाख 20 हजार डॉलर म्हणजेच 9.72 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारेच नाही तर सेमी फायनलमध्ये पोहोचणारे संघ सुद्धा मालामाल होणार आहेत. सेमी फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघाला 560,000 डॉलर 4.86 कोटी रुपये मिळतील. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी एकूण 60 कोटी रुपये बक्षीसांवर खर्च करणार आहे. वर्ष 2017 रोजी शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात आली होती. तेव्हा पाकिस्तानने याचे विजेतेपद जिंकले होते. 2017 च्या तुलनेत विजेत्यांच्या बक्षीस रकमेत 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच ग्रुप स्टेज सामने जिंकणाऱ्या संघांना देखील प्रति सामना 29.54 लाख रुपये दिले जातील.
हेही वाचा : IPL 2025 ला कधी पासून होणार सुरुवात? 'या' टीममध्ये होणार पहिला सामना, वेळापत्रक आलं समोर
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार असून यात स्पर्धेत पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असणाऱ्या संघांना 3.03 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. तिथेच सातव्या आणि आठव्या स्थानी असणाऱ्या संघाला 1.21 कोटी रुपये दिले जातील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाला 1.08 कोटी अतिरिक्त रक्कम दिली जाईल. 1996 नंतर प्रथमच पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन केले जात आहे. यंदा 8 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले असून यात प्रत्येक ग्रुपमध्ये टॉप 2 वर असणाऱ्या संघांमध्ये सेमी फायनल खेळवली जाईल.
20 फेब्रुवारी : गुरुवार - भारत विरुद्ध बांगलादेश - ठिकाण : दुबई
23 फेब्रुवारी : रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान - ठिकाण : दुबई
2 मार्च : रविवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड - ठिकाण : दुबई