ज्ञानेश्वर पतंगे, विकास माने (प्रतिनिधी) बीड : राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज बीड दौऱ्यावर होत्या. त्यांनी मस्साजोग गावात जाऊन मयत संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीमुळं देशमुख हत्या प्रकरण छडा लावण्यासाठी धसांनंतर सुळे आक्रमक होणार असंच दिसतंय.
बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सुरुवातीपासून आक्रमक राहिले. मात्र धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी समोर आल्यापासून धस बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. हीच वेळ साधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आता फ्रंटफूटवर आल्याचं दिसतंय शरद पवारांचा मागच्या महिन्यात मस्साजोग दौरा होऊनही सुप्रिया सुळे या संतोष देशमुखांच्या घरी गेल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार बजरंग सोनावणे होते. त्यांनी देशमुख कुटुंबाची व्यथा जाणून घेतली. सुप्रियांसमोर न्याय मागताना संतोष देशमुखांची आई, त्यांची पत्नी आणि मुलगी तसंच भाऊ धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले. देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायला आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांशी बोलू असं आश्वासन सुप्रिया सुळेंनी दिलं.
फक्त राज्याचे गृहमंत्रीच नाही तर आपण केंद्रीय गृहमंत्र्यांकडेही या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याचं सुळेंनी देशमुख कुटुंबाला सांगितलं. इतकंच नाही तर संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर मागच्या 69 दिवसापासून आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडला नाहीय. ना त्याचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागलाय. त्यावरुनही सुप्रिया सुळेंनी आग्रहाची मागणी केलीय.
हेही वाचा : छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची मुख्यमंत्र्यांकडून दखल, झी 24 तासच्या मोहिमेचा इम्पॅक्ट
सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मुंडे बहीण भावावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. शरद पवारांपासून सुप्रिया सुळेंपर्यंत सगळे भेटून गेले. मात्र ते दोघांनी अजूनही आपल्या कुटुंबाची भेट घेतली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. फक्त देशमुख कुटुंबच नाही तर 2023 मध्ये बीडमध्ये हत्या झालेल्या महादेव मुंडेंच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन सुप्रिया सुळेंनी दिलं. मात्र सुप्रियाताईंनी आवाहन करुनही ज्ञानेश्वरी मुंडे या आंदोलनावर ठाम आहेत.
देशमुख हत्याप्रकरणी आजपर्यंत सुरेश धस यांनीच आक्रमकपणे मुद्दा उचलून धरला. मात्र मुंडे भेटीनंतर झालेल्या आरोपांमुळे धसांविरोधात आरोपांची राळ उडालीय. त्यामुळं देशमुख प्रकरण धसास लावण्यासाठी धसांनंतर आता सुप्रिया सुळे पुढे सरसावल्यात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि मुंडेना अडचणीत आणण्यासाठी आता सुप्रिया सुळे मैदानात उतरल्यात. त्यांचं आक्रमक होणं धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादी अजित पवारांनाही भविष्यात अडचणीचं ठरु शकतं.