महाराष्ट्रात MSEB ने बसवेले TOD मीटर म्हणजे मोठा घोळ! ज्यांना फुकट मीटर बसवून दिलेत ते इतके का संतापले?

महावितरण कंपनीनं आता प्रीपेड वीज मीटरऐवजी नवीन टीओडी वीज मीटर बसवून द्यायला सुरुवात केलीय. मात्र या टीओडी वीज मीटरवरुनही आता नाराजीचा सूर निघत आहे. त्यासाठी कारण ठरतंय सकाळी आणि रात्रीचे वीजेचे वेगवेगळे दर. नेमकं काय आहे हे टीओडी वीज मीटरचं प्रकरण जाणून घेऊया.

वनिता कांबळे | Updated: Feb 18, 2025, 09:04 PM IST
महाराष्ट्रात MSEB ने बसवेले TOD मीटर म्हणजे मोठा घोळ! ज्यांना फुकट मीटर बसवून दिलेत ते  इतके का संतापले?

MSEB TOD meters : महाराष्ट्रात महावितरण कंपनीने जुन्या नेहमीच्या मीटरच्या जागी टीओडी मीटर बसवायला सुरवात केलीय. जुने मीटर प्रीपेड मीटर किंवा सदोष नादुरुस्त मीटरच्या जागी हे नवीन टाईम ऑफ डे मीटर म्हणजेच टीओडी मीटर लावायला राज्यात सुरुवात झालीय.सध्या नवीन मीटर हवे असलेल्या ग्राहकांना आणि तक्रारी असलेल्या ग्राहकांना हे मीटर दिले जातायत. मात्र यामुळे अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याच्या तक्रारी उद्योगांनी आणि विविध संस्थांनी केल्यात. 

सध्या महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना हे डिजिटल वीज मीटर मोफत बसवून दिलं जात आहेत.  टीओडी मीटरमध्ये दिवस, रात्रीच्या वीज वापराचा वेगवेगळा डेटा रेकॉर्ड केला जाणार आहे.  सकाळच्या वीजवापराचे वेगळे, रात्रीच्या वीजवापराचे वेगळे दर लागू होणार आहेत. 

हे देखील वाचा... महाराष्ट्राच्या राजकारणाप्रमाणेच प्रशासनातही मोठी खळबळ! 18 दिवसांत 26 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

सोलर पॉवर प्रकल्पांसाठी नेट मीटर तसेच अचूक मीटर रिडींग ची माहिती टीओडी मीटरमुळे मिळेल असा दावा महावितरणने  केला आहे.  टीओडी मीटरमुळे वीज युनिट खर्च, मीटर रीडिंगची माहिती महवितरणच्या App वरुन मोबाईलवर मिळेल.
खरंतर औद्योगिक वापरासाठी टीओडी मीटरचा वापर यापूर्वीच सुरू झालाय आहे. रात्रीच्यावेळी उद्योगांना वीज दरात 2 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 

मात्र दुसरीकडे घरगुती वापरात मात्र रात्री वीजेचे दर जास्त लावण्यात आले आहेत. 1 एप्रिलपासून घरगुती ग्राहकांना टाईम ऑफ डे  म्हणजेच टीओडी प्रमाणे वीजदर लागू होणार आहेत. महावितरणकडून विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.  यात घरगुती ग्राहकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वीजदरात सवलत दिली जात आहे.  मात्र, याला ग्राहक मंचानं तीव्र विरोध केलाय. तसंच घरांमध्ये रात्री वीजेचा वापर जास्त होतो. त्यामुळं घरगुती वापरातही रात्रीच्या वीजदरात सूट देण्याची मागणी त्यांनी केलीय. 

टीओडी वीज मीटरबाबत हे आक्षेप नोंदवल्यावर संपूर्ण वीज मंडळात कॅमेरासमोर बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिलाय. वीज नियामक आयोगात सुनावणी चालली असल्यानं यावर प्रतिक्रिया देता येणार नाही असं सांगितलं जातेय. मात्र या लपवाछपवीमुळे टीओडी वीज मीटर खरंच ग्राहकांच्या भल्यासाठी आहेत की महावितरण कंपनीच्या असा सवाल कोट्यवधी वीज ग्राहकांकडून विचारला जात आहे.