अखेर ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 'या' देशात होणार, ICC ने घेतला मोठा निर्णय

भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात जाऊन चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवण्यासाठी भारत सरकारने परवानगी नाकारली होती. 

पुजा पवार | Updated: Dec 13, 2024, 08:15 PM IST
अखेर ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 'या' देशात होणार, ICC ने घेतला मोठा निर्णय  title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आयसीसीने पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलने खेळवायला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे फेब्रुवारी - मार्च दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे काही सामने हे पाकिस्तान आणि दुबई येथे सुद्धा खेळवले जातील. या संदर्भात बीसीसीआय (BCCI) आणि पीसीबी (PCB) यांच्यात सामंजस्य झालं असून टीम इंडिया (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने हे दुबईत खेळवले जातील. तर इतर संघांचे सर्व सामने हे पाकिस्तानात आयोजित केले जातील. 

BCCI आणि PCB या दोघांनी 2026 च्या T20 वर्ल्ड कप ग्रुप स्टेज सामन्यांसाठी पाकिस्तान भारतात जाणार नाही यावर तत्वतः सहमती दर्शवली आहे. पाकिस्तान T20 वर्ल्ड कप 2026 मधील सामने हे कोलंबोमध्ये खेळेल. पाकिस्तान हा सामना कोलंबोमध्ये खेळणार आहे. हायब्रीड मॉडेलवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केल्यामुळे पीसीबीला कोणतीही भरपाई मिळणार नाही. पण 2027 नंतर ते आयसीसी महिलांच्या कोणत्याही स्पर्धेचे यजमानपद भूषवू शकतात. 

हेही वाचा : 'माझं दोनदा ऑपरेशन झालं तेव्हा...' विनोद कांबळीचा सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर केला खुलासा

 

भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात जाऊन चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवण्यासाठी भारत सरकारने परवानगी नाकारली होती. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 'हायब्रीड मॉडेल' हा एकमेव पर्याय होता. बीसीसीआयने पत्र लिहून आयसीसीला याविषयी सांगितले होते. यानंतर आयसीसीच्या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेल स्वरूपात ही स्पर्धा आयोजित करण्याला कडाडून विरोध केला होता. पण काही काळाने ते हायब्रीड मॉडेलद्वारे चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यास तयार झाले. शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही हायब्रीड मॉडेलने पाकिस्तान आणि दुबई येथे खेळवली जाईल असे सांगितले. 

1996 नंतर पाकिस्तानात होणार आयसीसी स्पर्धा : 

1996 वर्ल्ड कपनंतर पाकिस्तानात आयोजित केला जाणारा हा पहिला आयसीसी इव्हेंट आहे. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोघांनी मिळून या वर्ल्ड कपचे आयोजन केले होते. मात्र 2012 नंतर टीम इंडिया पाकिस्तानात कोणतीही सीरिज खेळण्यासाठी जात नाही. 2023 मध्ये देखील आशिया कपचे आयोजन हे पाकिस्तानात झाले होते. मात्र भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिल्यामुळे आशिया कप 2023 मधील भारताचे सामने हे श्रीलंका येथे खेळवण्यात आले. 2017 नंतर प्रथमच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार आहे.