विशाल करोळे आणि ज्ञानेश्वर पतंगे (प्रतिनिधी) बीड : संतोष देशमुखांच्या हत्येचा पुरावा एका मोबाईलमध्ये असल्याचा दावा करण्यात येतोय. विष्णू चाटेचा मोबाईल हाती लागल्यास हत्येचा पुरावा समोर येणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी केलाय. त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल कुठे आणि कुणाजवळ आहे असा सवाल आता उपस्थित झालाय.
संतोष देशमुखांच्या हत्येला 56 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही यातील एक आरोपी फरारच आहे. कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाहीये. तर दुसरीकडे आरोपींना वाचवण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केला आहे. विशेष म्हणजे विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केला आहे. विष्णू चाटेचा मोबाईल मिळाल्यास सर्व पुरावे हाती येणार असल्याचं देशमुख म्हणालेत. हत्येच्या दिवशी विष्णू चाटेनं कुणाशी बोलला याचं सत्य समोर येणार असल्याचंही देशमुख म्हणालेत.
विष्णू चाटे सध्या संतोष देशमुखांच्या हत्येप्रकऱणी अटकेत आहे. मात्र अजूनही त्याचा मोबाईल पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे त्याचा मोबाईल गेला कुठे असा सवालही आता उपस्थित होतोय.
विष्णू चाटेवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विष्णू चाटे राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष असून त्याच्यावर संतोष देशमुख खुनात सहभागाचा गुन्हा आणि आवादा कंपनीकडून खंडणी मागीतल्याचे दोन गुन्हे आहेत. यावरून आता मनोज जरागेंनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केलंय. वाल्मिक आणि त्याच्या टीमला धनंजय मुंडेंचा आशीर्वाद असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय.
बीडमधील सर्व पोलीस आणि संबंधीत राजकीय नेत्यांचे सीडीआर तपासले तर हत्येचं सत्य समोर येणार असल्याचा पुनरुच्चार आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय. संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास यंत्रणा करताहेत. मात्र विष्णू चाटेचा मोबाईल कुठे गेला याचा शोध अद्यापही लागलेला नाहीये. त्यामुळे तातडीनं विष्णू चाटेच्या मोबाईलचा शोध घेण्याची गरज आहे.