मुंडेंचं बहुजन कार्ड! दमानियांनी बीड आणि समाजाला बदनाम केलं, धनंजय मुंडेंचा आरोप

Dhananjay Munde On Damaniya : मला बदनाम करण्यासाठी हे सगळे आरोप केले जात असल्याचा आरोपही यावेळी धनंजय मुंडेंनी केला आहे. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी जातीलाही मध्ये आणल्याचं पाहायला मिळालं. 

पुजा पवार | Updated: Feb 4, 2025, 07:39 PM IST
मुंडेंचं बहुजन कार्ड! दमानियांनी बीड आणि समाजाला बदनाम केलं, धनंजय मुंडेंचा आरोप title=
(Photo Credit : Social Media)

कृष्णात पाटील (प्रतिनिधी) मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले आहेत. मला बदनाम करण्यासाठी हे सगळे आरोप केले जात असल्याचा आरोपही यावेळी धनंजय मुंडेंनी केला आहे. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी जातीलाही मध्ये आणल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे धनंजय मुंडे बहुजन कार्ड खेळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर आरोपांची तोफ डागल्यानंतर धनंजय मुंडेंनीही जोरदार बचाव केलाय. अंजली दमानिया या गेल्या दोन महिन्यांपासून हे ना ते कारण काढून बीड जिल्हा आणि परळीची बदनामी करतायत असा आरोपही मुंडेंनी केलाय. एवढंच नव्हे तर आपल्यावरील आरोप हे जातीवरीलच आरोप आहेत असा पलटवार धनंजय मुंडेंनी केला आहे. 

काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जात महंत नामदेवशास्त्रींची भेट घेतली होती. आणि तत्काळ नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबाही जाहिर केला होता. नामदावशास्त्रींच्या पाठिंब्यानंतर शास्त्रींच्या भूमिकेवर राज्यभरातून जोरदार टीका झाली. नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना समाजाचा पाठिंबा आणि सहानुभुती मिळवायची होती अशीही चर्चा राज्यभरात रंगली होती. ज्याच्यामागे जातीचं पाठबळ आहे त्याला कायदा हात लावत नाही अशी टीका संजय राऊतांनी चारच दिवसांपूर्वी केली होती. 

धनंजय मुंडेंनी त्यांच्यावरील आरोपांचा प्रतिवाद केलाच शिवाय आपण बहुजन असल्यानंच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं सांगत सहानुभूती कार्डही खेळण्याचा प्रयत्न केलाय. जेव्हा नेत्याचं राजकारण धोक्यात येतं तेव्हा जातीधर्माची ढाल पुढं करण्याची एक प्रथा रुढ होताना दिसतेय. आपल्यावर आरोप झाले की मी अमुक एका जातीधर्माचा असल्याने मला टार्गेट केलं जात असल्याचं नेत्यांचं वक्तव्य नवं नाहीय. धनंजय मुंडेंच्या वक्तव्यातूनही आपल्याला हेच पाहायला मिळालं.