मनसे-राष्ट्रवादीची राजकीय कुस्ती! बोलाबोलीच्या वादात कोण कोणावर पडलय भारी?

MNS-NCP verbal Dispute: आमदार खासदार निवडून आणण्याची क्षमता यावर सध्या मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान शाब्दीक युद्ध सुरू झालंय. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 9, 2025, 09:42 PM IST
मनसे-राष्ट्रवादीची राजकीय कुस्ती! बोलाबोलीच्या वादात कोण कोणावर पडलय भारी? title=
मनसे-राष्ट्रवादीची राजकीय कुस्ती

MNS-NCP verbal Dispute: राज ठाकरेंची मनसे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. 1 खासदार असलेल्या अजित पवारांचे 40 आमदार कसे निवडून आले? असा सवाल राज ठाकरेंनी केला. त्यावरुन मागच्या 10 दिवसापासून वादप्रतिवाद सुरुच आहेत. आत अजित पवारांनी उत्तर दिल्यावर मनसेचा तीळपापड झाला आणि संदीप देशपांडेंनी अजितदादांना चांगलंच सुनावलंय. बघुयात नेमकं काय झालंय.

आमदार खासदार निवडून आणण्याची क्षमता यावर सध्या मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान शाब्दीक युद्ध सुरू झालंय. विधानसभा निवडणुकीनंतर मनसेच्या पहिल्यावहिल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका घेतली. तेव्हा 40 आमदार निवडून येण्यावरुन राज ठाकरेंनी अजित पवारांना टोले लगावले. राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे इतके आमदार निवडून येण्यावर शंका उपस्थित केल्यावर अजित पवारही भडकले. त्यांनी शेलक्या शब्दात मनसेला सुनावलं. अमित ठाकरेंच्या पराभवावर बोट ठेवल्यावर अमित ठाकरेंनी यावर संयमी प्रतिक्रिया दिली.

अमित ठाकरेंनी संयम दाखवला असला तरी अजित पवारांची ही टीका मनसेच्या जिव्हारी लागली. मनसे नेते संदीप देशपांडेंनी तर 'भाजपचा पदर पकडून निवडून आले' असं म्हणत अजित पवारांना थेट आव्हानच दिलंय. धक्कादायक म्हणजे पूर्वाश्रमीचे राज ठाकरेंचे खंदे समर्थक आणि आता भाजपचे नेते असलेले प्रवीण दरेकर यांनीही अजित पवारांनाच चिमटे काढलेत. 

सध्या सत्तेत टिकून राहण्यासाठी युती आघाडीचा टेकू प्रत्येकालाच लागतोय. त्यात मागच्या दोन वर्षात पक्ष फोडाफोडीच्या राजकारणानं कुणाचा पक्ष खरा इथपासून, कुणाची निवडून येण्याची ताकद किती याचा अंदाज ना जनतेला लागतोय, ना त्या त्या पक्षातल्या नेत्यांना. मात्र एकमेकांच्या राजकीय ताकदीवरुन एकमेकांना टोले लगावण्याची ही राजकीय कुस्ती रोजच रंगताना दिसते. त्यात विरोधकांसह सत्तेत बसलेलेही एकमेकांना आपल्या ताकदीच्या बेटकुळ्या दाखवाताना दिसताहेत. त्यातूनच रोज नवनवीन वादाला फोडणी मिळतेय. मात्र या बोलाबोलीच्या वादात खरंच हे पक्ष स्वबळावर स्वत:ची खरी ताकद आजमावणार का? असा प्रश्न जनतेलाही पडलाय.