बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने (Mamta Kulkarni) किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर (Mahamandaleshwar of the Kinnar Akhara) पदाचा राजीनामा दिला आहे. ममता कुलकर्णीची महांडलेश्वर पदावर नियुक्ती करण्यात आल्यापासून वाद निर्माण झाला होता. आखाड्यातील लोकांनीही तिला विरोध केला होता. चित्रपट क्षेत्रातील तिच्या भूतकाळामुळे तिच्या आध्यात्मिक पात्रतेबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तिने हा निर्णय घेतला आहे. किन्नर आखाड्याने यापूर्वी ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना काढून टाकलं आहे.
ममता कुलकर्णीने व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. वादावर भाष्य करताना तिने म्हटलं आहे की, "मी महामंडलेश्वर यमाई माता नंदगिरी, या पदावरुन पायउतार होत आहे. मी 25 वर्ष केलेल्या आध्यात्मिक साधनेमुळे हा सन्मान मिळाला होता. पण काही लोकांना मी महामंडलेश्वर होण्यावर समस्या आहे".
पुढे ती म्हणाली की, "माझे गुरु, श्री चैतन्य गगनगिरी महाराज, एक सिद्ध महापुरुष होते. मी त्यांच्याकडे 25 वर्षं तपश्चर्या केली आहे. मला कैलास, मानसरोवर किंवा हिमालयात जाण्याची गरज नाही कारण सर्व जग माझ्यासमोर आहे".
VIDEO | Former Bollywood actress Mamta Kulkarni steps down as Mahamandaleshwar of the Kinnar Akhara, amid backlash. Here's what she said in a video message:
I, Mahamandaleshwar Yamai Mamta Nandgiri, am resigning from this post. The respect given to me was for my 25 years of… pic.twitter.com/W436VvnSny
— Press Trust of India (@PTI_News) February 10, 2025
ममता कुलकर्णीने तिच्या नियुक्तीभोवती असलेल्या आर्थिक वादांवरही भाष्य केले आणि म्हटले की जेव्हा त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडे ती रक्कम नव्हती. जय अंबागिरी महामंडलेश्वर यांनी स्वतःच्या खिशातून पैसे दिले, असं तिने सांगितलं आहे. त्यांच्याकडे असलेले पैसे त्यांच्या खोल तपश्चर्येतून आले आहेत, भौतिक गोष्टींमधून नाही असंही ती म्हणाली.
24 जानेवारी रोजी, 52 वर्षीय ममता कुलकर्णीचा जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी महेंद्रानंद गिरी, आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि इतर किन्नर महामंडलेश्वरांच्या उपस्थितीत अधिकृतपणे महामंडलेश्वर म्हणून अभिषेक करण्यात आला. ममता कुलकर्णीचे नाव बदलून यमाई ममता नंद गिरी असं ठेवण्यात आलं. यावेळी इतर पाच जणांनाही महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली.
अजय दास यांनी पत्रकार परिषधेत जाहीर केले की, “किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर पदावरून लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना हटवले जात आहे. राजद्रोहाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या ममता कुलकर्णी यांना आखाड्याच्या परंपरांचे पालन न करता महामंडलेश्वर म्हणून नियुक्त करून त्यांनी सनातन धर्माच्या तत्त्वांचा आणि राष्ट्रीय हिताचा अवमान केला आहे.”