MMRDA Mumbai Master Plan : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( MMRDA) एमएमआरच्या विकासासाठी एक मास्टरप्लान तयार केला आहे. मुंबईच्या धर्तीवर संपूर्ण एमएमआर जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी एमएमआरडीएने नीती आयोगाला एक प्रस्ताव पाठवला आहे. या योजनेअंतर्गत, एमएमआरमधील विविध ठिकाणांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन 7 ठिकाणी ग्रोथ हब अर्थात व्यापार केंद्रे विकसित करण्याची योजना आहे. या ठिकाणी रिटेल आणि रेसिडेंशियल स्पेस निर्माण केल्या जाणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेशाला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे निती आयोगाचे टार्गेट आहे. निती आयोगाने तयार केलेल्या मास्टर प्लॅनमध्ये 19 ठिकाणी नवीन आर्थिक केंद्रे विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. या प्लाननुसार एमएमआरमध्ये सात ठिकाणी व्यापार केंद्रे विकसित केली जाणार आहेत. यात बीकेसीसह वडाळा फायनन्शियल सेंटर, नवी मुंबई एअरोसिटी, खारघर, कुर्ला आणि वरळी, बोईसर आणि विरार बुलेट ट्रेन स्टेशन, गोरेगाव फिल्म सिटी यांचा समावेश आहे.
आर्थिक भांडवल, बंदर, उत्पादन केंद्र, जागतिक कनेक्ट, देशांतर्गत कनेक्ट, मनोरंजन भांडवल, किनारपट्टी, रोजगार बाजार, ऐतिहासिक महत्त्व अशा 9 वैशिष्ट्यांना लक्षात घेऊन एमएमआरने मुंबईत 7 ठिकाणी ग्रोथ हब विकसित करण्याचा प्लान बनवला आहे. बीकेसीच्या 30 हेक्टर परिसरात जागतिक दर्जाचे व्यवसाय केंद्र विकसित करण्याची योजना आहे. हे वित्त केंद्र वडाळा येथील 20 हेक्टर परिसरात बांधले जाणार आहे. खारघरमधील कॉर्पोरेट पार्क आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 250 हेक्टर जमिनीचा पुनर्विकास केला जाणार आहे.
या ठिकाणी वित्त सेवा, न्यूज एज सेवा, आरोग्यसेवा, शिक्षण, विमान वाहतूक, मीडिया, जागतिक क्षमता केंद्र आणि डेटा सेंटर विकसित केले जाणार आहेत. एमएमआर विकसित झाल्याने नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. हे व्यापारी संकुल झोपडपट्टीमुक्त असणार आहेत. येथे 30 लाख परवडणारी घरे बांधली जाणार आहेत. याअंतर्गत 22 लाख झोपड्यांचा पुनर्विकास करण्याची योजना आहे. पुनर्विकास करुन येथे 10 लाख घरे बांधली जाणार आहेत.
बीकेसीमधील ई ब्लॉकमधील 20 हेक्टर जागेवर हे व्यापर केंद्र असेल. येथे व्यावसायिक, रहिवासी वापरासह हायस्ट्रीट रिटेल, मॉल्स, मनोरंजन आणि रिक्रिएशनल जागा निर्माण केल्या जातील. बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकावर 10 हेक्टर जागेवर मिक्स यूज पद्धतीने विकास केला जाणार आहे. येथे रिव्हर फ्रंट, रिटेल आणि रेसिडेंशियल स्पेसेस असणार आहेत. कुर्ला येथे 10.5 हेक्टर तर वरळी येथे 6.4 हेक्टर जागेवर कार्यालये, हॉटेल्स, हॉस्पिटल, मनोरंजन हब, रहिवासी आणि व्यावसायिक जागांचा विकास प्रस्तावित आहे. वडाळा बिझनेस डिस्ट्रीक्ट अंतर्गत 20 हेक्टर जागेवर फिनटेक, स्टार्टअप, अपार्टमेंट्स, हॉटेल्स या अनुषंगाने विकास केला जाणार आहे. नवी मुंबई एअरोसिटी अंतर्गत नवी मुंबई विमानतळानजीक 270 हेक्टर जागेवर पंचतारांकित हॉटेल, मनोरंजन केंद्र, प्रदर्शन केंद्र उभारले जाणार आहेत. गोरेगाव फिल्म सिटीत 110 हेक्टर जागेवर मनोरंजन क्षेत्राच्या अनुषंगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या फिल्मसिटीच्या अनुषंगाने उद्योग - व्यवसायांना चालना देण्यासाठी नविन केंद्र उभारली जाणार आहेत.