Maharashtra Weather News : एप्रिल आणि मे महिना अद्यापही दूर असतानाच महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये ऊन्हाच्या झळा तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान इथं फेब्रुवारीपासूनच कमाल तापमानात सातत्यानं वाढ होताना दिसत असून, महाराष्ट्रातून हिवाळा हद्दपार होऊन त्याची जागा केव्हाच उन्हाळ्यानं घेतली आहे. फेब्रुवारीतच तापमानाचा आकडा 38 अंशांपर्यंत पोहोचल्यामुळं यंदाचा मे महिना आणखी किती तापदायक असणार या भीतीनंच नागरिकांना धडकी भरत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवणार आहे. तर, कोकण आणि नजीकच्या भागामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती असून, इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही उकाडा वाढत असून, सूर्य डोक्यावर आल्यानंतर आता अनेक भागांमध्ये घराबाहेर पडणं कठीण होताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र मात्र इथं काही प्रमाणात अपवाद ठरत असून, इथं अद्यापही पहाटेच्या वेळी काही जिल्ह्यांमध्ये गारठा जाणवत आहे. दिवस पुढे सरकल्यानंतर मात्र इथंही कमाल आणि किमान तापमानात वाढ होताना दिसत आहे.
हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांच्या माहितीनुसार 25 आणि 26 फेब्रुवारी या दोन दिवशी राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारीला प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी इथं; तर 26 फेब्रुवारी रोजी पालघर इथं उष्मा वाढणार असून, उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये तापमानवाढ कायम राहील असा इशारा देण्यात आला असल्यानं नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी अशाही मार्गदर्शक सूचना यंत्रणेकडून जारी करण्यात आली आहे.
24 Feb Evening updates: Heatwave alert issued by #IMD_Mumbai for #Mumbai #Thane, #Raigad, #Ratnagiri for 25th & 26th Feb. For #Palghar on 26th Feb.
Keep watching please for temperature updates daily on IMD. @RMC_Mumbai pic.twitter.com/NLmDIYs620— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 24, 2025
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) माहितीनुसार उत्तराखंड आणि हिमाचल प्रांतासह अरुणाचल प्रदेश, मेघालय इथं आकाश निरभ्र असेल. जम्मू काश्मीरमध्ये पुढील 48 तासांमध्ये पावसाचा हलका शिडकावा होऊ शकतो. तर, फेब्रुवारीअखेरीस हिमाचल प्रदेशातही पावसासह हिमवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे.