प्रसिद्ध मराठी रिल स्टारचा दुर्देवी अंत! मुलाची हत्या करुन बापाची आत्महत्या; धरणात सापडला मृतदेह

Famous Reel Star Killed By His Father: पोलिसांना ही सुसाईड नोट मिळाल्यानंतर त्यांनी तपासाची चक्र फिरवली आणि चिठ्ठीत नमूद केलेली गोष्ट खरी ठरली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 28, 2025, 09:16 AM IST
प्रसिद्ध मराठी रिल स्टारचा दुर्देवी अंत! मुलाची हत्या करुन बापाची आत्महत्या; धरणात सापडला मृतदेह
पोलिसांना दोघांचेही मृतदेह सापडले

Famous Reel Star Killed By His Father: जळगाव जिल्ह्यामधील धरणगाव-एरंडोल तालुक्याला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका प्रसिद्ध स्थानिक इन्स्टाग्राम रील स्टारची हत्या करण्यात आल्याचा उलगडा झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मयत रील स्टारच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या घरात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आपणच मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह धरणामध्ये पुरल्याचं म्हटलं आहे. दोघांचाही मृत्यू झाल्याने या भयंकर घटनेमागील नेमकं कारण काय आहे हे अद्याप समोर आलेलं नसून या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.

वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये काय होतं?

भोरखेडा येथे राहणारा 22 वर्षीय प्रसिद्ध रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. विकीचे वडील विठ्ठल सखाराम पाटील यांनी आत्महत्या केली आहे. विठ्ठल पाटील हे माजी सैनिक होते. विठ्ठल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधूनच मुलाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. "मी माझ्या मुलाचा खून केला असून, त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आला आहे," असे विठ्ठल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

...अन् मृतदेह सापडला

विठ्ठल यांच्या आत्महत्येनंतर ही चिठ्ठी सापडल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सुसाईड नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता, गुरुवारी दुपारी भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकी पाटीलचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला.

नक्की वाचा >> वसई हादरली! प्रियकराने प्रेयसीला UP मधून बोलावलं, गळा दाबून संपवलं अन् तिचा मोबाईल...

या प्रकरणाचं गूढ वाढलं....

पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला. मात्र विक्कीला त्याच्याच वडिलांनी का संपवलं? त्यांनी स्वत: यानंतर आत्महत्या का केली? याची कारणं अद्याप समोर आलेली नाहीत. यासंदर्भात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अमळनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांनी दिली. दोघांमध्ये नेमकं काय घडलं? विकीची हत्या करण्यात आल्याची कल्पना इतर कोणाला होती का? विठ्ठल यांनी आपल्याच मुलाला का संपवलं असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून पोलीस या प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत.