Maharashtra Weather News : हिवाळा सरून मध्य भारतासह दक्षिणेकडील राज्यांमध्येसुद्धा तापमानवाढीस सुरुवात झाली आणि पाहता पाहता यंदाच्या वर्षी उन्हाळा तुलनेनं लवकरच सुरू झाल्याचं स्पष्ट झालं. राज्यात ऐन फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा वाढला असून बुधवारी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आलेल्या दहा शहरांमध्ये मुंबईचीसुद्धा नोंद करण्यात आली. जिथं हे शहर 38.5 अंशांसह दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळालं. शहरातील ही स्थिती कायम राहणार असून, पुढच्या 24 तासांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुंबईत हवामान विभागानं उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला असून, कमाल तापमान 39 अंश तर, किमान तापमानाचा आकडा 22 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिना यंदा मुंबईकरांसाठी अडचणीचा ठरला असून, शहरातील तापमान 5 अंशांनी जास्त असल्याचं पाहायला मिळालं. फक्त मुंबईच नव्हे, तर राज्याच्या कोकण आणि विदर्भ क्षेत्रातही उष्णतेचा दाह घाम फोडणार आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात प्रामुख्यानं मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गु, पालघर इथं उष्मा वाढणार असल्यामुळं इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जाणकारांच्या मते मुंबईत झालेली तापमानवाढ ही य़ेत्या काही वर्षात सामान्य बाब ठरणार आहे. सध्या मध्य पूर्वेकडून भारतीय उपखंडाच्या दिशेनं वारे वाहत आहेत. ज्यामुळं या प्रवासादरम्यान येणाऱ्या वाळवंटीय क्षेत्रातील पृष्ठाचं तापमान वाढत असून, त्यामुळं उष्ण वारे प्रवाहित होत आहेत. परिणामी आपल्या दिशेनं वाहणारे वारे सोबतीनं उष्णता आणि दमटपणाही आणत असून, तापमानवाढीस कारणीभूत ठरत आहेत.
Very good #heatwave_alerts by @RMC_Mumbai, 48 hrs in advance for konkan region:
Tmax today on 26 Feb, #Mumbai Scz 38.5 #Dahanu 38.2 #Thane 38.0 #Ratnagiri 37.2 @CMOMaharashtra @SDMAMaharashtra @mybmc https://t.co/dQThI9Tc7H— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 26, 2025
एकिकडे महाराष्ट्रात उकाड्यानं नागरिक आतापासूनच हैराण झालेले असताना देशाच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये अर्थात अतीव उत्तपेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर क्षेत्रात आता एक पश्चिमी झंझावात सक्रिय होणार असून, त्यामुळं पुन्हा जोरदार हिमवृष्टीस सुरुवात होणार आहे. काश्मीरच्या खोऱ्यात पुढील 48 तासांमध्ये जोरदार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवत नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे. तर, हिमाचल प्रदेशातही तापमानात घट नोंदवली जाईल असं सांगितलं जात आहे. उत्तराखंडच्या डोंगळा भागांमध्येही शीतलहरींचा प्रभाव दिसणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.