Chhaava Movie Controversy: 'छावा' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही वाददेखील उफाळून आले आहे. छ्त्रपती संभाजी महाराज यांना औंरगजेबाने कैद करुन अत्यंत निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आली. गणोजी आणि कान्होजी यांनी फितुरी केल्यामुळं संभाजी राजे औंरगजेबाच्या हाती लागले, असं चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मात्र, चित्रपटातील याच दृश्यावरुन वाद निर्माण झाले आहेत. गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या वंशजांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात न्यायालीयन लढाईला सुरुवात करत असल्याचा घेतला निर्णय त्यांनी घेतला आहे.
छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात शिर्के घराणे आक्रमक झाले आहेत. पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात कुलदैवत शिरकाई देवी मंदिरात सर्व कुटुंबीयांतील सदस्यांनी एकत्र येत गावकऱ्यांसोबत बैठक घेतली. मंदिरात शिरकाई देवीची आरती आणि पूजा करत छावा चित्रपटाचा दिग्दर्शकांच्या विरोधातील रस्त्यावरील आणि न्यायालीयन लढाईला सुरुवात करत असल्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये खूप मोठा लढा उभा राहतोय, शिर्के घराण एकत्र येतंय, त्यामुळं वातावरण तापण्याआधीच लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटातील वादग्रस्त भाग तात्काळ वगळवा, अशी मागणी शिर्के कुटुंबीयांनी केली आहे. आम्ही छत्रपती यांचे मावळे आहोत, गनिमीकाव्याने लढा लढणार, लढा कसा असणार हे आत्ता सांगणार नाही, त्यांना वेळोवेळी तो कळेल आणि त्यांना तो सहन होणारं नाही, असा इशारा यावेळी शिर्के कुटुंबियांतर्फे देण्यात आला आहे.
शिर्के कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, छावा चित्रपट हा शिवाजी सावंत यांच्या छावा कांदबरीवर आधारित आहे. कांदबरीत गणोजी शिर्के, कानोजी शिर्के, शिरकाण गावचे त्यांचे कुलदैवत या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. पण या चित्रपटात मी त्यांचं नावही घेतलं नाहीये. गावही दाखवलेले नाहीये. गणोजी आणि कान्होजी या एकेरी नावाने चित्रपटात उल्लेख केला आहे, असं लक्ष्मण उतेकर यांनी म्हटलं आहे. एका रिपोर्टनुसार, लक्ष्मण उतेकर यांनी भूषण शिर्के यांच्याशी संपर्क केला आणि अजाणतेपणी कुटुंबाच्या भावनांना ठेच पोहोचली असेल तर मी माफी मागतो, असंही लक्ष्मण उतेकर यांनी म्हटलं आहे.