'मास्क'चा वापर करुन बायकोला गंडा, पुण्यात जोरदार चर्चेत आलाय हा फसवणुकीचा फंडा

 पुण्यात एका भामट्यानं चक्क आपल्या बायकोला गंडा घातलाय. तिच्या नावावरची दोन घरंच स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत. 

Updated: Jun 24, 2021, 09:11 PM IST
'मास्क'चा वापर करुन बायकोला गंडा, पुण्यात जोरदार चर्चेत आलाय हा फसवणुकीचा फंडा title=

पुणे : पुण्यात एका भामट्यानं चक्क आपल्या बायकोला गंडा घातलाय. तिच्या नावावरची दोन घरंच स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत. ती देखील चक्क मास्कचा वापर करून. आईला फसवणा-या ठकसेनने बायकोलाही गंडा घातला.  नेमकी कशी झालीये ही बनवाबनवी. याबाबत पुणेकर ही हैराण झाले आहेत. कोरोनामुळे सक्तीच्या असलेल्या मास्कचा गैरफायदा घेत एका ठकसेनानं आपल्याच बायकोला गंडा घातलाय.

कविता जाधव यांचे पुण्यात दोन फ्लॅट आहेत. तर आणखी दोन फ्लॅट त्यांचे पती राहुल यांच्या संयुक्त मालकीचे आहेत. पत्नीच्या नावावर असलेल्या फ्लॅटवर राहुलचा डोळा होता. त्याला अर्थात कविता तयार नव्हत्या. मग या पठ्ठ्यानं शक्कल लढवली. भलत्याच बाईला आपली पत्नी म्हणून नोंदणी कार्यालयात नेलं. कुणी ओळखू नये, यासाठी मास्कचा आधार घेतला आणि कवितांचे फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतले. अगदी काही क्षण फक्त फोटो काढण्यापुरता या तोतया बायकोनं मास्क काढला. त्यामुळे कागदपत्रांमध्ये नाव कवितांचं आणि फोटो भलतीचाच छापला गेलाय.

कविता जाधव यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय.  राहुलनं पूर्वी मोलकरणीला आपली आई म्हणून उभं करत तिची मालमत्ताही स्वतःच्या नावावर करून घेतली होती. आता तर कोरोनाच्या मास्कचा गैरफायदा घेत, त्यानं चक्क बायकोच बदलली. बनावट कागदपत्रे, बनावट माणसे दाखवून मालमत्ता हडप करणे हे प्रकार नवीन नाहीत. मात्र त्यासाठी वापरण्यात आलेली मास्कची शक्कल नेहमीपेक्षा वेगळी आहे. म्हणून तिची सध्या तिची जोरदार चर्चा सुरू आहे.