Abhishek Bachchan Election Debut : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यंदा अनेक कलाकारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपुत्र आणि प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे अभिषेक बच्चन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचेही बोललं जात आहे.
अभिषेक बच्चनला समाजवादी पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यप्रदेशातील खजुराहो या मतदारसंघातून त्याला निवडणुकीचे तिकीट मिळू शकतं, असं बोललं जात आहे. सध्या भारतीय जनता पक्षाने खजुराहो या मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांना तिकीट दिले आहे. शर्मा यांना कडवं आव्हान देण्यासाठी समाजवादी पक्षाकडून अभिषेक बच्चनला तिकीट दिले जाऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. पण अद्याप याबद्दल समाजवादी पक्ष, अखिलेश यादव किंवा बच्चन कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
I.N.D.I.A आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसने मध्यप्रदेशातील खजुराहो मतदारसंघाची जागा ही समाजवादी पक्षासाठी सोडली आहे. त्यामुळे काँग्रेस या ठिकाणी उमेदवार देणार नाही. यामुळे सध्या या जागेवर भाजप उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. पण जर अभिषेक बच्चनला या मतदारसंघाचे तिकीट मिळाले तर मात्र व्हीडी शर्मा यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
बच्चन कुटुंबाचे मध्यप्रदेशासोबत फार जुनं नातं आहे. याचा मोठा फायदा समाजवादी पक्षाला होऊ शकतो. दरम्यान मध्यप्रदेशात काँग्रेस 28 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर खजुराहोची एकमेव जागा समाजवादी पक्षाला देण्यात आली आहे. तर भाजप येथे सर्व 29 जागांवर निवडणूक लढवत आहे. खजुराहोमध्ये येत्या 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान अभिषेक बच्चन हा शुजित सरकारच्या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या घूमर चित्रपटात तो झळकला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.