भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटर आणि प्रशिक्षक योगराज सिंग (Yograj Singh) आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. पण काही मतं स्पष्ट मांडताना ते वादग्रस्त विधानं करतात आणि यामुळेच ते अडचणीत सापडतात. दरम्यान पुन्हा एकदा ते आपल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. युट्यूबर समदीश भाटियाच्या (Samdish Bhatia) पॉडकास्टला योगराज सिंग यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर परखडपणे आपलं मत मांडलं. भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग यांनी यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसह (Sachin Tendulkars son Arjun Tendulkar) असणाऱ्या नात्यावरही भाष्य केलं.
योगराज सिंग अर्जुन तेंडुलकरला 2022 मध्ये आपल्या सेंटरमध्ये प्रशिक्षण देत होते. पण 12 दिवसांतच हे प्रशिक्षण संपलं होतं. योगराज सिंग यांनी दावा केला आहे की, फक्त 12 दिवसांच्या प्रशिक्षणात अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) गोवा संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि राजस्थानविरोधातील सामन्यात शतक ठोकलं. यामुळे अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून करारबद्धही करण्यात आलं.
दरम्यान अर्जुन तेंडुलकरने त्यांच्या अंतर्गत प्रशिक्षण घेणं बंद का केलं? असं विचारलं असता त्यांनी कोणालाही त्याचं नाव माझ्याशी जोडलं जावं असं वाटत नव्हतं असं म्हटलं. "जेव्हा त्याने आपल्या पदार्पणात शतक ठोकलं आणि आयपीएलमध्ये परतला तेव्हा लोकांना भिती वाटू लागली की, त्याचं नाव फक्त माझ्यासोबत जोडलं गेलं तर? मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजत आहे ना? त्यामुळे लोकांना त्याच्या नावासह माझा टॅग लागल्याची भिती वाटत होती," असं योगराज सिंग यांनी 'Unfiltered by Samdish' वर बोलताना म्हटलं.
"मी युवराज सिंगला बोललो, सचिनला सांग त्याला माझ्याकडे एका वर्षासाठी सोड आणि काय होतं ते बघ," असंही योगराज सिंग म्हणाले.
आतापर्यत अर्जुन तेंडुलकरने 17 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात 37 विकेट्स आणि 532 धावा केल्या आहेत. अ श्रेणीत त्याने 18 सामने खेळत 102 धावा केल्या आहेत आणि 25 विकेट घेतल्या आहेत.
2023 मध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून पाच आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फक्त तीन विकेट्स घेतल्या आहेत. तथापि, आगामी आवृत्तीच्या मेगा लिलावात पाच वेळा विजेत्या असलेल्या अर्जुनला त्याच्या 30 लाखांच्या रुपयांच्या स प्राईसवर परत आणले. योगराज यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी भारतासाठी एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले. भारतीय संघासाठी त्याचा शेवटचा सामना 1981 मध्ये झाला होता.