IPL 2024 Auction Uncapped Player Got Big Money: इंडियन प्रिमिअर लिगच्या लिलावामध्ये अनेक नवाजलेल्या क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस पडला. ऑस्ट्रेलियाच्या 2 वेगवान गोलंदाजांसाठी तर 20 कोटींहून अधिकची बोली लागली. मात्र या सेलिब्रेटी क्रिकेटपटूंच्या गर्दीमध्ये भारतीय संघासाठी अजून एकही सामना न खेळलेले नवखे क्रिकेटपटूही चांगलाच भाव खाऊन गेलेत. समीर रिझवी आणि शुभमन दुबे असं या 2 क्रिकेटपटूंचं नाव आहे. या दोघांनाही आपल्या संघात घेण्यासाठी संघ मालकांमध्ये स्पर्धा लागली होती.
शुभमन दुबेसाठी राजस्थान रॉयल्सने तब्बल 5.8 कोटी रुपये मोजले आहेत. तर रिझवीसाठी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने तब्बल 8.4 कोटी रुपये मोजलेत. दोन्ही क्रिकेटपटूंचे घरगुती क्रिकेटमधील आकडे पाहिल्यानंतरच त्यांच्यासाठी एवढी रक्कम संघांनी का मोजलीय हे लक्षात येतं. हे दोघेही उत्तम फिनिशर आहेत. दुबे हा विदर्भासाठी खेळतो तर रिझवी उत्तर प्रदेशसाठी खेळतो. दुबेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या स्पर्धेत 7 सामन्यांमध्ये 221 धावा केल्या होत्या. दुबेचा स्ट्राइक रेट 187.28 इतका होता. बंगलाविरुद्धच्या सामन्यामध्ये दुबेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी मिळाली आणि त्याने धावांचा पाठलाग करताना मोलाची कामगिरी केल्याने विदर्भाच्या संघाला यशस्वीपणे धावांचा पाठलाग करता आला. 213 धावांचा पाठलाग करताना दुबेने 20 बॉलमध्ये 58 धावा केल्या. दुबेने नाबाद राहत 13 बॉल शिल्लक असतानाच सामना जिंकून दिला. दुबेने आपल्या या छोट्याश्या खेळीमध्ये 3 चौकार आणि 6 षटकार लगावले होते. दुबे हा स्थानिक क्रिकेटमधील रन मशीन म्हणून ओळखला जातो.
दुसरीकडे रिझवीने उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्सकडून खेळताना सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम केला आहे. रिझवीने या स्पर्धेत 2 दमदार शतकांच्या सहाय्याने तब्बल 455 धावा केल्या. या कामगिरीनंतर अनेक आयपीएल संघांनी रिझवीला ट्रायलसाठी बोलावलं. मात्र रिझवीने उत्तर प्रदेशच्या संघातून अंडर 23 स्पर्धेत खेळण्याचा निर्णय़ घेतला. रिझवीने सय्यद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धेत 10 षटकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट 139.89 इतका होता. त्यामुळे रिझवी हा आयपीएलचा नवा सिक्सर किंग ठरु शकतो असंही म्हटलं जात आहे.
आयपीएल 2024 साठी दुबईतल्या कोका-कोला एरिनात (Coca-Cola Arena ) लिलाव पार पडला. या लिलावत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बाजी मारली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starck) आयपीएल इतिहासातील सर्वात जास्त बोली लागली. कोलकाता नाईट रायडर्सने स्टार्ससाठी तब्बल 24.75 कोटी रुपये मोजले. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सवर (Pat Cummins) सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपये खर्च केले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शानदार सेंच्युरी करणारा ट्रेव्हिस हेड सनरायजर्स हैदराबादकडे 6.80 कोटी रुपयांना विकला गेला.