Virat Kohli Birthday : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) 5 नोव्हेंबर 2023 रोजी त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट कोहली त्याच्या वाढदिवशी ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. विराटच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सेलिब्रिटांपासून खेळाडूंपर्यंत सर्वांनीच विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोहलीच्या या खास दिवशी, भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने (Yuvraj Singh) सोशल मीडियावर विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच त्याने विराटसाठी इतरही अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. या पोस्टसोबत त्याने काही फोटोही शेअर केले आहेत.
मैदानात उतरण्यापूर्वी युवराज सिंगने इंस्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट केली आहे. युवराजने पोस्टमध्ये खुलासा केला की कोहली देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि नंतर संघात स्थान मिळवत असताना त्याने मेहनत घेतली होती. 'जेव्हा तू संधींसाठी उत्सुक असलेला आणि कामगिरीसाठी भुकेलेला युवा खेळाडू म्हणून संघात सामील झालास, तेव्हा प्रत्येकाला हे स्पष्ट झालं होतं की तू एक महान खेळाडू होशील. तू केवळ तुझा ठसा उमटवला नाही तर असंख्य लोकांना त्यांचा सर्वोत्तम खेळ खेळण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली आहे, असे युवराजनं म्हटलं आहे.
'तू रेकॉर्ड तोडण्याचे आणि बनवण्याचे आणखी एक वर्ष साजरे करत असताना, जे काही साध्य केले आहे त्यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ काढ. मला अभिमान आहे की मी काही काळासाठी या अविश्वसनीय प्रवासात तुझा भागीदार होतो आणि तुला हळूहळू मजबूत आणि मोठे होताना पाहिले. माझी इच्छा आहे की तुझा जोश आणि दृढनिश्चय तुला आणि भारतीय संघाला विश्वचषकात नवीन उंचीवर घेऊन जाईल आणि आमच्या देशाला पुन्हा एकदा अभिमान वाटेल. किंग कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, असेही युवराजने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
When you joined the team as a youngster who was eager for opportunities and hungry to perform, it was clear to everyone that you were destined for greatness. You've not only made a mark for yourself but have also inspired countless others to strive for excellence.
As you… pic.twitter.com/2FXP5GqH9q
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) November 5, 2023
दरम्यान, विराट कोहली आणि युवराज सिंग यांनी 2011 चा एकदिवसीय विश्वचषक एकत्र जिंकला होता. युवराज सिंग हा टूर्नामेंटचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट होता, या सामन्यात कोहलीने 9 सामन्यांत 282 धावा केल्या. या तरुणाने बांगलादेशविरुद्धच्या स्पर्धेतही शतक ठोकले होते. आता, राष्ट्रीय संघासोबत एक दशकाहून अधिक क्रिकेट केल्यानंतर विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोणाच्याही नावावर 2 एकदिवसीय विश्वचषक नाही आणि जर भारताने 2023 ची आवृत्ती जिंकली, तर कोहली हा अविश्वसनीय कामगिरी करणारा पहिला खेळाडू बनेल.