'नेमका त्याच्या कपाळावरच...' रचिन रवींद्रची दुखापत किती गंभीर? न्यूझीलंड क्रिकेटने दिले अपडेट्स, IPL ला मुकणार?

रचिनला दुखापत होऊन आता काही तास उलटून गेले आहेत. तेव्हा सध्या त्याची तब्येत कशी आहे याबाबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून अपडेट्स देण्यात आले आहेत. 

पुजा पवार | Updated: Feb 9, 2025, 12:14 PM IST
'नेमका त्याच्या कपाळावरच...' रचिन रवींद्रची दुखापत किती गंभीर? न्यूझीलंड क्रिकेटने दिले अपडेट्स, IPL ला मुकणार? title=
(Photo Credit : Social Media)

Rachin Ravindra Injured : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात शनिवार 8 जानेवारी रोजी वनडे सीरिजमधला पहिला सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 78 धावांनी पराभव केला. परंतु या सामन्यात न्यूझीलंडच्या युवा खेळाडूसह धक्कादायक घटना घडली. पाकिस्तानच्या फलंदाजाचा कॅच पकडताना अंदाज चुकल्याने बॉल थेट  रचिन रवींद्रच्या (Rachin Ravindra) चेहऱ्यावर जाऊन आदळला. आघात इतका जोरदार होता की, रचीनला रक्तबंबाळ अवस्थेत मैदान सोडावं लागलं. रचिनला दुखापत होऊन आता काही तास उलटून गेले आहेत. तेव्हा सध्या त्याची तब्येत कशी आहे याबाबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून अपडेट्स देण्यात आले आहेत. 

कोण आहे रचिन रवींद्र?

रचिन रवींद्र हा न्यूझीलंडचा ऑल राउंडर खेळाडू असून तो भारतीय वंशाचा आहे. त्याचे वडील रवी कृष्णमूर्ती हे न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्यांच्या मूळ गावी बंगलोर येथे क्लबमध्ये क्रिकेट खेळायचे. अवघ्या २५ वर्षांचा रचिन रवींद्रने कमी वयात क्रिकेट विश्वात चांगलं नाव कमावलं आहे. रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती यांना क्रिकेटची खूप आवड आहे आणि ते भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचे चाहते आहेत. जेव्हा त्यांच्या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्यांनी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावरून मुलाचे नाव 'रचिन' असे ठेवले. रचिन रवींद्र आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. 

हेही वाचा : MS Dhoni च्या रांची येथील घराला नवा लूक, भिंतीवर हेलिकॉप्टर शॉट सह नंबर 7

 

मैदानात नेमकं काय घडलं? 

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून 330 धावांचा डोंगर उभा केला. मात्र विजयाचं आव्हान पूर्ण करणं पाकिस्तानला शक्य झालं नाही. 36 व्या षटकात पाकिस्तानच्या खुशदिल शाहने मायकेल ब्रेसवेलचा बॉल स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि तो थेट रवींद्रकडे गेला. रवींद्रने झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अंदाज चुकला. अंदाज चुकल्याने चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला. यामुळे रचिनला गंभीर दुखापत झाली आणि तेथून रक्त यायला लागले. फिझिओने रक्त थांबवण्यासाठी त्याच्या तोंडावर टॉवेल ठेऊन त्याला मैदानाबाहेर आणले. 

न्यूझीलंड क्रिकेटने दिले हेल्द अपडेट्स : 

न्यूझीलंडच्या क्रिकेटच्या एका निवेदनात म्हटले आहे की, 'सामन्यादरम्यान बॉल पकडायला जात असताना तो रचिनच्या कपाळावर लागला आणि त्याला दुखापत झाली. यावेळी दुखापत झालेल्या ठिकाणावरून रक्तस्त्राव होत असल्याने त्याला तात्काळ मैदानाबाहेर नेण्यात आले. त्याच्या दुखापतीचं मूल्यांकन करण्यात आलं असून त्याची तब्येत सध्या स्थिर आहे. आम्ही त्याच्या तब्येतीवर सतत लक्ष ठेऊन आहोत आणि त्याच्या दुखापतीच मूल्यांकन केलं जाईल. 

आयपीएल 2025 ला मुकणार का? 

आयपीएलमध्ये रचिन रवींद्र हा चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. आयपीएल 2024 च्या मिनी ऑक्शनमध्ये सीएसकेने रचिनला संघात घेतलं आणि त्याला पदार्पणाची संधी देखील दिली. त्यानंतर आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये देखील 4 कोटींची बोली लावून चेन्नईने त्याला आपल्या संघात घेतलं. परंतु रचिनला झालेली ही दुखापत पाहून तो आयपीएल पर्यंत फिट होईल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. आयपीएल 2025 मार्चच्या 21 तारखेपासून सुरु होणार आहे . रचिन रवींद्र हा चेन्नई सुपरकिंग्सच्या संघातील सलामीवीर फलंदाज आहे, मात्र त्याला झालेल्या दुखापतीमुळे सीएसकेचं टेन्शन देखील वाढलं असेल.