अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा भारतीय क्रिकेट संघाला लाभलेला एक गुणवान खेळाडू आहे. जेव्हा कधी परदेशात खेळण्याची वेळ येते तेव्हा अजिंक्य रहाणे नेहमीच संघासाठी योगदान देतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्याला संघात स्थान मिळत नसून अन्याय होताना दिसत आहे. चौथ्या क्रमांकासाठी अगदी भरवशाचा खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेला गेल्या 2 वर्षात राष्ट्रीय संघात स्थान मिळालेलं नाही. कसोटीसह एकदिवसीय आणि टी-20 संघासाठीही त्याचा विचार करणं बंद केलं आहे. अजिंक्य रहाणे हा फार व्यक्त होणार क्रिकेटर नाही. मात्र नुकतंच त्याने निवड समितीत असणाऱ्या काही त्रुटी बोलून दाखवल्या आहेत. 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलनंतर संघातून बाहेर जाण्यासंदर्भात आपल्याशी कोणत्याही वरिष्ठाने संवाद साधला नसल्याचं त्याने सांगितलं आहे.
"काही वर्षांपूर्वी जेव्हा मला संघातून वगळण्यात आलं तेव्हा मी धावा केल्या होत्या. मला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी निवडण्यात आलं आणि नंतर पुन्हा वगळण्यात आलं. पण खेळता यावं यासाठी माझ्या नियंत्रणात काय आहे? मी स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर पुन्हा बोलावण्यात आलं. जेव्हा कधी अनुभवी खेळाडूला परत बोलावलं जातं तेव्हा त्याला आपल्याला 2-3 मालिका खेळण्यास मिळतील हे माहिती असतं. दक्षिण आफ्रिका आव्हानात्मक मालिका असेल याची मला कल्पना होती आणि मी बोलावणं येईल याची वाट पाहत होतो. पण मला बोलावणं आलं नाही. मी इतकी वर्षं क्रिकेट खेळत असल्याने मला वाईट वाटलं," असा खुलासा अजिंक्य रहाणेने इंडियन एक्स्प्रेशी संवाद साधताना केला आहे.
आपल्याला अनेकांनी व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला, पण समोरील व्यक्ती बोलण्यास तयार नसल्याने आपण ते करु शकलो नाही असाही खुलासा त्याने केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपनंतर आपल्याला बोलावणं येईल अशी आपल्याला आशा होती, मात्र कोणतंही स्पष्टीकरण न देता दरवाजा दाखवण्यात आला असंही त्याने सांगितलं.
"मी अशी व्यक्ती नाही जो जाऊन मला संघाबाहेर का काढलं असं विचारेल. तिथे कोणताही संवाद नव्हता. अनेकांनी मला जाऊन चर्चा कर असं सांगितलं. पण त्यासाठी समोरील व्यक्ती बोलण्यास तयार हवी. जर ती व्यक्ती तयार नसेल तर भांडण्यात अर्थ नाही. मला समोरासमोर बोलायचं होतं. मी कधीही मेसेज केला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपनंतर मला ड्रॉप केलं तेव्हा फार विचित्र वाटलं, कारण मी फार मेहनत घेतली होती. पुढील मालिकेत मी असेन असं मला वाटलं होतं. संताप करण्यात काही अर्थ नाही. जे माझ्या हातात आहे तेवढंच मी करु शकतो. पण मी कमबॅक करेन असा विश्वास वाटत आहे," असंही अजिंक्य रहाणेने म्हटलं आहे.
निवड किंवा निवड न करण्याबाबत चाहत्यांचा दबाव निर्माण करण्यात खेळाडूंच्या पीआर टीम देखील मोठी भूमिका बजावतात. तथापि, रहाणेने खुलासा केला की त्याच्याकडे त्याची बाजू मांडण्यासाठी पीआर टीम नाही.
"मी नेहमीच लाजाळू होतो, आता मी थोडा व्यक्त होऊ लागलो आहे. माझे लक्ष क्रिकेट खेळणे आणि घरी जाणे यावर आहे. पुढे जाताना काही गोष्टींची आवश्यकता असेल असे मला कोणीही सांगितलं नाही. आज देखील कधीकधी मला वाटते की बस क्रिकेट खेळो, घर जाओ. आता मला सांगितले जाते की मला बोलण्याची गरज आहे, माझ्या मेहनतीबद्दल सांगण्याची गरज आहे. लोक म्हणतात की तुम्हाला बातम्यांमध्ये राहण्याची गरज आहे. माझ्याकडे पीआर टीम नाही, माझा एकमेव पीआर माझे क्रिकेट आहे. मला आता कळले आहे की बातम्यांमध्ये राहणे महत्वाचे आहे. अन्यथा, लोकांना वाटते की मी वर्तुळाबाहेर आहे," असं रहाणे म्हणाला.