Call Merging Scam : मागील दोन दशकांमध्ये तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की, एकिकडे याच तंत्रज्ञानाच्या बळावर एकिकडे देश प्रगती करत आहे तर, दुसरीकडे मात्र याच तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणुकीच्या नवनवीन पद्धतींचा वापर करत अनेकांची बँक खाती रिकामं करण्याचं काम घोटाळेबाज आणि स्कॅमर करताना दिसत आहेत.
देशात मिस्ड कॉल स्कॅमनंतर आणखी एक घोटाळा डोकं वर काढत असून, यामध्ये युजर्सच्या बँक खात्यावर घोटाळेबाजांचा डोळा असल्याचं म्हटलं जात आहे. हा घोटाळा आहे 'Call Merging Scam'. UPI नं या स्कॅमबाबत सतर्कतेचा इशारा देत फोन कॉल मर्ज करत कशा प्रकारे युजरच्या कोणत्याही गोपनीय माहितीशिवायही एका ओटीपीच्या (One-Time Password) सहाय्यानं गंडा घालतात हे या इशाऱ्यात नमूद करण्यात आलं आहे.
ओटीपी मिळाल्यानंतर स्कॅम करणाऱ्यांना तुमचा इतर कोणताही अॅक्सेस लागत नसून ते थेट बँक खात्यातून पैसे काढतात. केंद्र शासनाच्याही ही बाब लक्षात येताच तातडीनं त्यांच्या वतीनं आणि आर्थिक संस्थांच्या वतीनं विविध अॅप वापरणाऱ्या युजरना या नव्या घोटाळ्यासंदर्भात सतर्क करण्यात आलं आहे.
नेशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नं X च्या माध्यमातून या घोटाळ्याची माहिती देत इथं कॉल मर्जिंग अर्थात एकाच फोन कॉलमध्ये दोन फोन कॉल जोडले जाण्याच्या प्रक्रियेचा हवाला दिला. हा घोटाळा नेमका कसा केला जातो आणि इथं कोणकोणत्या पद्धतींनी फसवणूक होते याची मुद्द्यांनुसार माहितीसुद्धा देण्यात आली.
इथं फसवणूक करणारी टोळी तुम्हाला फोन करते आणि हा फोन नोकरी किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्यात आल्याचं सांगते. याचवेळी ते तुम्हाला तुमच्याच एका ओळखीच्या व्यक्तीशीसुद्धा संवाद साधत असल्याचं सांगते. इथून पुढं तुम्हाला कॉल मर्ज करण्यास सांगितलं जातं. पण, तुम्हाला येणारा दुसरा फोन हा OTP साठीचा असतो. तुम्ही हा कॉल मर्ज केल्यास स्कॅमर तुमचा ओटीपी ऐकतात. या स्कॅमच्या जाळ्यात अडकायचं नसेल तर सध्या अनोळखी क्रमांकांवरून येणारे फोन न उचलण्याचा सल्ला दिला जात आहे.
Scammers are using call merging to trick you into revealing OTPs. Don’t fall for it! Stay alert and protect your money. Share this post to spread awareness!#UPI #CyberSecurity #FraudPrevention #StaySafe #OnlineFraudAwareness #SecurePayments pic.twitter.com/kZ3TmbyVag
— UPI (@UPI_NPCI) February 14, 2025
तुमच्या माहितीशिवाय जर तुम्हाला एखादा ओटीपी येत असेल, तर सर्वप्रथम तो ज्या क्रमांकावरून आला आहे तो पाहून घ्या आणि काहीही संशयास्पद बाब आढळल्यास 1930 या क्रमांकावर त्याबाबतची रितसर माहिती द्या.