'यापुढे तुम्ही...', रणवीर अलाहबादियावरुन सुरु असलेल्या वादादरम्यान केंद्राचा OTT प्लॅटफॉर्म्सना इशारा, 'नैतिकतेच्या नियमांचं...'

सुप्रीम कोर्टाने ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात काहीतरी करण्याची गरज आहे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नियमनाच्या अभावाचा युट्यूबर्स गैरवापर करत असल्याचं सांगितल्यानंतर केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 20, 2025, 04:54 PM IST
'यापुढे तुम्ही...', रणवीर अलाहबादियावरुन सुरु असलेल्या वादादरम्यान केंद्राचा OTT प्लॅटफॉर्म्सना इशारा, 'नैतिकतेच्या नियमांचं...'

सुप्रीम कोर्टाने YouTube वरील अश्लील कंटेंटसंदर्भात नियमन करण्याची गरज असल्याचं सांगितल्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी ओटीटी प्लॅटफॉर्मना नैतिकतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. आता बंद पडलेल्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये करण्यात आलेल्या अश्लील विनोदाच्या वादादरम्यान सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म्सना नैतिकतेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ऑनलाइन क्युरेटेड कंटेंट पब्लिशर्स आणि  ओटीटी प्लॅटफॉर्मच्या स्वयं-नियामक संस्थांना भारताच्या कायद्यांचे आणि माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया, नीतिमत्ता संहिता) नियम 2021 मध्ये नमूद केलेल्या नीतिमत्तेचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्यासाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे.

"ऑनलाइन क्युरेटेड कंटेंट (OTT प्लॅटफॉर्म) आणि सोशल मीडियाच्या काही पब्लिशर्सकडून प्रकाशित करण्यात आलेल्या अश्लील, पॉर्नोग्राफिक आणि घाणेरड्या कंटेंटच्या कथित प्रसाराबाबत माननीय संसद सदस्यांकडून, वैधानिक संस्थांकडून प्रतिनिधींकडून आणि सार्वजनिक तक्रारींकडून मंत्रालयाला संदर्भ मिळाले आहेत," असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. नैतिकतेचं पालन करताना OTT प्लॅटफॉर्मने कायद्याने प्रतिबंधित असलेला कोणताही कंटेंट दाखवू नये असं यात नमूद करण्यात आलं आहे. 

समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानावरुन त्याच्याविरुद्ध दाखल केलेले एफआयआर एकत्र करण्याची मागणी करणाऱ्या युट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं.

'इंडियाज गॉट लेटेंट'चा नेमका वाद काय?

युट्यूबर रणवीर अलाहबादियाने 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्याने एका स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. "तुम्ही आयुष्यभर तुमच्या पालकांना दररोज सेक्स करताना पाहाल की ते कायमचे थांबवण्यासाठी एकदाच सामील व्हाल?", अशी विचारणा त्याने एका स्पर्धकाला केली होती. प्रेक्षकांना हा विनोद रुचला नाही, आणि यानंतर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. तसंच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील अशा कंटेंटवर निर्बंध आणण्याची मागणी होऊ लागली. 

त्यानंतर हा शो यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे आणि अलाहबादियाने माफी मागितली आहे. "ही टिप्पणी केवळ अनुचितच नव्हती, तर ती मजेशीरही नव्हती. विनोदा हा माझा पिंड नाी. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे," असं त्याने म्हटलं होतं.

अलाहबादियाविरुद्ध आतापर्यंत तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. एक आसाममध्ये, दुसरी मुंबईत आणि सोमवारी जयपूरमध्ये त्याच्याविरुद्ध नवीन एफआयआर दाखल करण्यात आला. मुंबई आणि गुवाहाटी पोलिसांनी तो सतत संपर्काबाहेर असल्याचं सांगितलं आहे.