तुमच्या पाळीव कुत्र्याला लिफ्टमध्ये आणू नका असं सांगणाऱ्या लहान मुलालाच महिलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही व्हायरल झालं आहे. या व्हिडीओत मुलगा महिलेला पट्टा न बांधलेल्या श्वानाला आत आणू नका अशी विनंती करताना दिसत आहे. पण महिला उलट त्या मुलालाच बाहेर खेचून काढते आणि मारते. ग्रेटर नोएडामधील गौर सिटी 2 अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडला आहे.
नोएडाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शक्ती मोहन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.
व्हिडीओत दिसत आहे की, आठ वर्षांचा मुलगा सुरुवातीला लिफ्टमध्ये एकटा असतो. मुलगा शिकवणीनंतर घरी जात होता. यावेळी लिफ्ट एका माळ्यावर आल्यावर दरवाजा उघडतो. त्यावेळी महिला आपल्या श्वानासह तिथे उभी असते. तिने श्वानाच्या गळ्यात पट्टा घातलेला नव्हता. श्नानाला पाहिल्यानंतर मुलगा घाबरलेला दिसत आहे. यावेळी तो महिलेला पट्टा न बांधलेल्या श्वानाला लिफ्टमध्ये आणू नका अशी विनवणी करतो. पण महिला काही त्याचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
A woman in Noida enters the lift with a dog. The child gets scared seeing the dog. The woman takes the child out of the lift and slaps him.
— Rishi Bagree (@rishibagree) February 20, 2025
याउलट ती संतापून मुलालाच लिफ्टच्या बाहेर खेचते. यानंतर लिफ्टचा दरवाजा बंद होते. माहितीनुसार, महिला मुलाला अनेक कानाखाली मारते. काही संकेदाने दरवाजा पुन्हा उघडतो आणि मुलगा धावत लिफ्टमध्ये येतो. यावेळी महिलाही त्याच्या पाठून येते. नंतर मुलगा लिफ्टमध्ये रडताना दिसतो.
या घटनेनंतर हजारो रहिवासी रस्त्यावर उतरुन निषेध करु लागले. त्यांनी नोएडा पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या. महिला श्वानांवरुन नेहमी इमारतीतील रहिवाशांसह भांडत असते असं त्यांचं म्हणणं आहे.
"आम्हाला गौर सिटी 2 मध्ये एका महिलेने लिफ्टमध्ये एका मुलावर हल्ला केल्याची माहिती मिळाली. आम्ही तिला ताब्यात घेतले आहे आणि या प्रकरणाची चौकशी करत आहोत," असे सेंट्रल नोएडाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी शक्ती मोहन अवस्थी म्हणाले.
अलीकडच्या काळात नोएडा आणि ग्रेटरमधील गेटेड अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधून पाळीव कुत्र्यांच्या मालकांचे इतर रहिवाशांशी भांडण झाल्याची डझनभर प्रकरणे नोंदवली गेली आहेत.