'मला बेल्स पाल्सी झालाय', धनंजय मुंडेंचा खुलासा; हा आजार नेमका काय? लक्षणे, उपचार जाणून घ्या!

Dhananjay Munde Bells Palsy: चेहऱ्यावरील मज्जातंतूला जळजळ किंवा नुकसान झाल्यामुळे होणारा चेहऱ्याचा पक्षाघात म्हणजे बेल्स पाल्सी.

Pravin Dabholkar | Updated: Feb 20, 2025, 04:55 PM IST
'मला बेल्स पाल्सी झालाय', धनंजय मुंडेंचा खुलासा; हा आजार नेमका काय? लक्षणे, उपचार जाणून घ्या!
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Bells Palsy: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. यानंतर वाल्मिकच्या जवळचे असल्याने धनंजय मुंडेवर आरोप करण्यात आले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात अपडेट दिली आहे. धनंजय मुंडे बीडमधील कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. कॅबिनेट बैठकांना उपस्थित नव्हते. याचे कारण त्यांनी आपल्या पोस्टद्वारे सांगितले होते. दरम्यान त्यांनी आणखी एक पोस्ट केली आहे.  

काय म्हणाले धनंजय मुंडे?

माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. 
त्याच दरम्यान मला Bell's palsy नावाच्या आजाराचे निदान झाल्याचे त्यांनी सांगितले. 

त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नसल्याचे धनंजय मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. 

बेल्स पाल्सी म्हणजे काय? 

चेहऱ्यावरील मज्जातंतूला जळजळ किंवा नुकसान झाल्यामुळे होणारा चेहऱ्याचा पक्षाघात म्हणजे बेल्स पाल्सी होय. याला फेशियल पाल्सी असेही म्हणतात. या आजारात चेहऱ्याच्या एका बाजूला अशक्तपणा किंवा पक्षाघात होतो, चेहरा अर्धा वाकणे, हास्य वाकडे दिसते, पापणी झुकवणे, चवीची जाणीव कमी होणे, चक्कर येणे, कानात आवाज येणे (टिनिटस), डोकेदुखी आणि वेदना, चेहऱ्याच्या एका बाजूला अंगाचा त्रास जाणवणे अशी लक्षणे दिसतात. 

बेल्स पाल्सीची कारणे काय?

सर्दी किंवा फ्लू सारखा विषाणूजन्य आजार, चेहऱ्याच्या मज्जातंतूला सूज किंवा नुकसान पोहोचणे ही बेल्स पाल्सीची कारणे आहेत. 

बेल्स पाल्सीवर उपचार

बेल्स पाल्सीची लक्षणे आढळल्यास तुम्ही शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला डॉक्टरांच्या सल्लानुसार व्यायाम दिला जातो.