मुंबई : उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी गुहागरमधून माघार घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि कामगारमंमत्री भास्कर जाधवांना आव्हान देत निलेश राणेंनी गुहागरमधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती.
कोकणात नीलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पुन्हा पेटला. भास्कर जाधव यांच्याविरोधात गुहागरमधून अपक्ष निवडणूक लढण्याचा एल्गार नीलेश राणे यांनी केला होता. जाधवांची पैशाची मस्ती उतरवू असा निर्धार नीलेश राणे यांनी केला. भास्कर जाधव हे गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवतात. त्यांच्याविरोधात थेट गुहागरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचं नीलेश राणे यांनी जाहीर केलं होतं. मात्र, आज पत्रकार परिषद घेऊन नीलेशने निवडणूक मैदानातून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले.
नारायण राणेंची समजूत काढण्यात अपयश आल्यामुळं त्यांच्या सूचनेनुसार माघार घेत असल्याचं नीलेश राणे यांनी स्पष्ट केलंय. माझा संघर्ष पक्षाविरोधात नसून व्यक्तीविरोधात आहे. त्यामुळं आपला जाधवांविरोधातला लढा सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.