'तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळाबाहेर ठेवले असते तर..', फडणवीसांना ठाकरेंच्या सेनेचा टोला

Uddhav Thackeray Shivsena On Dhananjay Munde: उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 25, 2024, 07:38 AM IST
'तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळाबाहेर ठेवले असते तर..', फडणवीसांना ठाकरेंच्या सेनेचा टोला title=
ठाकरेंच्या शिवसेनेनं साधला फडणवीस सरकारवर निशाणा

Uddhav Thackeray Shivsena On Dhananjay Munde: परभणीत सोमनाथ सूर्यवंशी व बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे नक्की काय झाले? असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. या प्रश्नाचं उत्तर फडणवीस सरकारला देता आलेलं नाही, असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता थेट फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडेंचा उल्लेख करत संतोष देशमुख प्रकरणावरुन 'सामना'तून टीका केली आहे. 

...पण मुख्यमंत्री फडणवीसांनी तसे केले नाही

"सूर्यवंशी हे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते व स्वतः संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते असतानाही त्यांचा खून झाला. नमिता मुंदडा यांच्या निवडणुकीत सरपंच देशमुख हे त्यांच्या गावातील भाजपच्या बुथवर उपस्थित होते. अशा कार्यकर्त्याची हत्या का व्हावी व या हत्येमागे सतत एकच नाव का घेतले जाते?" असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे. "संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवार यांचे उजवे हात असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या ‘खास’ वाल्मीक कराडचे नाव घेतले जाते. हे सत्य असेल तर कराड यांना वाचविण्यासाठी धनंजय मुंडे हे नक्कीच प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत नुसत्या संशयावरून पोलिसांनी अनेकांना उलटे टांगून गुन्ह्याची कबुली घेतली, पण बीडच्या गुन्ह्यात पोलीस स्वतःच भेदरलेले दिसतात. कराड यांचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवले असते तर फडणवीस यांची नैतिकता व निष्पक्षता उजळून निघाली असती, पण मुख्यमंत्री फडणवीसांनी तसे केले नाही. कारण धनंजय मुंडे यांचे प्रमुख पालनहार तेच आहेत," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

अशा वल्गना मुख्यमंत्री करतात, पण...

"वाल्मीक कराड यांचा प्रभाव इतका की, देशमुख खून प्रकरणात त्यांना अद्याप पोलिसांनी साधे चौकशीलाही बोलावलेले नाही. बीड जिल्ह्यातली ही दहशत महाराष्ट्राला परवडणारी नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केज तालुक्यात मोर्चा काढला. संशयित कराड हा सरकारी मदतीने फरार असल्याचा त्यांचा आरोप आहे व हा आरोप खरा वाटावा असे वातावरण सध्या दिसत आहे. गुन्हेगार कितीही मोठा असो, त्याला सोडणार नाही. पाताळात लपला असला तरी त्याला शोधून काढू, अशा वल्गना मुख्यमंत्री करतात, पण सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुखांच्या खुनाचे खरे आरोपी मोकाट आहेत व मुख्यमंत्री फक्त तोंडाने हवा सोडत आहेत," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावला आहे.

नक्की वाचा >> 'फडणवीसांचे 'ते' वक्तव्य राहुल गांधींपेक्षा मोदींनी तंतोतंत लागू होते'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

फाशी देण्यासाठी आधी आरोपींना पकडावे लागेल आणि आज तरी...

"देशमुख यांची पत्नी व मुलांचा आक्रोश फडणवीसांना विचलित करीत नाही. परभणीत सूर्यवंशी यांच्या खुनाला वाचा फुटली तरी सत्य झाकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात. विरोधी पक्षाचे लोक बीड किंवा परभणीत गेले तर ‘हे लोक खुनाचे राजकारण करतात’ असे सरकार कोकलते. मग सरकारने असे खून रोखले पाहिजेत व खून झाले तर खऱ्या आरोपींना गजाआड केले पाहिजे. परभणी-बीड खून प्रकरणांतील आरोपींना फाशी देऊ अशी घोषणा अजित पवार यांनी केली, मात्र फाशी देण्यासाठी आधी आरोपींना पकडावे लागेल आणि आज तरी आरोपींना सरकारचे संरक्षण आहे," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलंय.

सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुखचे नक्की काय झाले? असा प्रश्न विचारणाऱ्यांना...

"लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परभणीत आले, याचा मुख्यमंत्री फडणवीसांना त्रास झाला. सरकारच्या गुंडांनी खून करावेत व विरोधी पक्षाने त्यावर बोलू नये अशी मोदी-फडणवीस वगैरे लोकांची अपेक्षा आहे काय? हा विचार निर्दय व अमानुषपणाचा आहे. सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुखचे नक्की काय झाले? असा प्रश्न विचारणाऱ्यांना उद्या देशद्रोही ठरवू नये म्हणजे झाले," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.