बीड प्रकरणावर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजात जे नेतृत्व उभं राहीलं, त्यांनी जे आंदोलन सुरु केलं त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपाने सुरेश धस नावाचा मोहरा पुढे आणला आणि संतोष देशमुख खुनाचा वापर केला असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपवर केला आहे. सुरेश धसांना याआधीच थांबायला हवं होतं असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या मराठा नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी सुरेश धस मोहरा पुढं केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे. मनोज जरांगे पाटलांना रोखण्यासाठी सुरेश धसांना भाजपने जाणीवपूर्वक पुढं आणल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आधार घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
एवढंच नाहीतर मराठा आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न सुरेश धसांच्या माध्यमातून केल्याचा आरोपही करण्यात आल्याचं अंबादास दानवेंचं म्हणणं आहे. सुरेश धस यांनी आकाचे आका हा शब्दप्रयोग सुरु करत बोंबाबोंब केली तेव्हाच त्यांना भाजपनं का रोखलं नाही? असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मनोज जरांगेंविरोधात सुरेश धसांना पुढं केल्याचा आरोप म्हणजे वेडेपणा असल्याचा पलटवारही बावनकुळेंनी केला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नख लावण्यासाठी सुरेश धस यांना उभं केल्याचा हा दावा मराठा समाजाला मान्य आहे का हा प्रश्न आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या आरोपामुळं नव्या वादाला तोंड फुटल्यासारखं झालं आहे.